-
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे.
-
लोकसभा निवडणुकीसाठी काल चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले.
-
असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
-
“महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे भाजपाबरोबर जाण्यास तयार होते. एकनाथ शिंदे जे बोलत आहेत, ते काहीही चुकीचं बोलत नाहीत”, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
-
तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत झालेल्या एका भेटीचाही उल्लेख केला आहे.
-
त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. प्रफुल्ल पटेल हे ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलत होते.
-
प्रफुल पटेल काय म्हणाले?
“महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले होते. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक तास चर्चा झाली होती. ते चर्चेसाठी वेगळे बसले होते. याबाबत त्यांचे काही लोक जे आता रोज सकाळी बोलण्यासाठी येतात (संजय राऊत) ते नाकरतील. मात्र, काही लोकांनी हे सांगितलं होतं की, उद्धव टाकरे हे पाऊल (भाजपा बरोबर जाण्याचं) उचलणार होते”, असं मोठं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं. -
पटेल पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याबाबत आज एकनाथ शिंदे जे बोलतात त्यामध्ये काहीही चुकीचे नाही. मी हे गॅरंटीने सांगतो आहे. कारण या सर्व गोष्टी त्यांच्याकडून आलेल्या आहेत की, उद्धव ठाकरे पुन्हा भाजपाबरोबर जाणार होते. मात्र, त्यामध्ये काही विलंब झाला. किंवा त्यामध्ये काही अडथळे आले असतील. आता आपल्याला त्यांच्यामधील काहीजण तत्वज्ञान देतात”, असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
-
उद्धव ठाकरे आता सत्तेत जाऊ शकतील का?
आताही ते (उद्धव ठाकरे) सत्तेत जाऊ शकतील का? असा प्रश्न यावेळी प्रफुल पटेल यांना विचारण्यात आला. यावर प्रफुल पटेल म्हणाले, “ते जाऊ शकतील की नाही हा विषय वेगळा आहे. मात्र, तेव्हा काय झालं होतं हे मी सांगतो आहे. कारण मी खरं बोलणारा माणूस आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.
“उद्धव ठाकरे हे पाऊल उचलणार होते”, प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान; म्हणाले “एकनाथ शिंदे जे बोलतात…”
लोकसत्ता लोकसंवाद या कार्यक्रमात बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले…
Web Title: Praful patel in loksatta lok samvad programme new statement on uddhav thackeray and pm modi meeting secrets revealed spl