-
आजपर्यंत या देशात कोणीही घेऊ शकलं नाही, असे धाडसी निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले, त्याबाद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवं, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केलं आहे.
-
तसेच महायुतीच्या व्यासपीठावरून त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमोर पाच मागण्यादेखील मांडल्या आहेत.
-
मुंबईतील शिवाजी पार्कवर १७ मे रोजी महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
-
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
“पंतप्रधान मोदी यांच्या २०१४-२०१९ च्या कार्यकाळाबद्दल मला जे बोलायचं होतं ते मी २०१९ ला बोललो. आता २०१९ ते आत्तापर्यंतचं बोलतो.” -
“माझ्यापूर्वी भाषण केलेल्या प्रत्येकाने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र, माझ्यामते त्यांच्यावर टीका करून वेळ वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही. कारण ते सत्तेत येणार नाहीत, मुळात अशा लोकांबाबत बोलण्यात काय फायदा?” अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
-
“धाडसी निर्णायांबद्दल मोदींचं अभिनंतर करायला हवं”
“पंतप्रधान मोदी होते म्हणूनच आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलं आहे, काश्मीरला विशेष दर्जा देणारा ३७० कलम रद्द झालं आहे. काश्मीर भारताचा भाग आहे हे ३७० कलम रद्द झाल्यानंतर भारतीयांना पहिल्यांदा वाटू लागले आहे.” -
“शाहबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पोटगीच्या बाजूने न्याय दिला होता, पण राजीव गांधींनी कायदा संमत करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. पण मोदींनी याच पीडित मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकमधून बाहेर काढलं, त्यांच्यावर जो अन्याय होत होता, तो अन्याय कायमचा दूर केला. हे सर्व निर्णय धाडसी होते, त्यामुळे पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करायला हवं”, असेही ते म्हणाले.
-
राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या
पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्याही मांडल्या. “पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे मी त्यांच्यापुढे काही मागण्या मांडतो आहे. पहिलं म्हणजे सर्वात आधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही जुनी मागणी आहे, ती मागणी त्यांनी पूर्ण करावी. मराठी भाषेला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्चा द्यावा.” -
“दुसरं म्हणजे जवळपास १२५ वर्ष या हिंदभूमीवर मराठा साम्राज्य होतं त्याचा इतिहासाचा देशातल्या प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा.”
-
“तिसरं म्हणजे शिवछत्रपतींची स्मारकं म्हणजे त्यांनी उभारलेले गडकिल्ले. या किल्ल्यांचं जतन करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष समिती नेमून लक्ष द्यावं.”
-
“चौथ म्हणजे देशात तुम्ही जसे उत्तम रस्ते बनवलेत, पण गेली २० वर्ष रखडलेला आमचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करून द्यावा. आणि शेवटचं म्हणजे मुंबई रेल्वेच्या विकासाकडे लक्ष द्यावं, रेल्वेच्या फेऱ्या वाढवा, प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून मुंबई रेल्वेला भरपूर निधी द्या”, असे राज ठाकरे म्हणाले.
-
नेहरूंचा उल्लेख, नेमकं काय घडलं?
राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांचं मुंबईत स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करताना पंडित जवाहरलाल नेहरुं यांच्यानंतर हिंदुस्थानचे तिसऱ्यांना पंतप्रधान बनणारे नरेंद मोदी असा केला आणि त्यानंतर भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरे यांनी अगदी सुरुवातीलाच नेहरु यांचे नाव घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं.
मोदींसमोर राज ठाकरेंच्या ‘या’ पाच मागण्या! पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख; काय घडलं वाचा
मुंबईतील शिवाजी पार्कवर १७ मे रोजी महायुतीची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे बोलत होते. (सर्व फोटो देवेंद्र फडणवीस या फेसबुक पेजवरून साभार.)
Web Title: Raj thackeray speech at shivaji park mumbai in the front of pm narendra modi spl