-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० पूर्ण झाले आहेत. संघाच्या विजयादशमीनिमित्त होणाऱ्या संचलनात आज संघ मुख्यालय, नागपूर येथे शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संबोधित केले. तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
-
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या भाषणात म्हटले की, माझ्या जीवनात डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरूषांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांच्या विचारांनी मी प्रभावित झालो.
-
रामनाथ कोविंद यांनी व्यक्तिगत आयुष्यातील उदाहरण देताना म्हटले की, संघात जातीभेदाला थारा दिला जात नाही. संघात सामाजिक समरसता आहे.
-
संघात समानता, समरसतेवर आधारित आणि जातीभेद विरहित वातावरण पाहून महात्मा गांधीही प्रभावित झाल्याचे रामनाथ कोविंद यांनी सांगितले.
-
महात्मा गांधी यांनी १६ सप्टेंबर १९४७ रोजी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रॅलीला संबोधित केले होते. या रॅलीत गांधीजी म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी त्यांनी डॉ. हेडगेवारांच्या एका शिबिराला भेट दिली होती, असा दावाही रामनाथ कोविंद यांनी केला.
-
रामनाथ कोविंद यांनी ऐतिहासिक दस्तऐवजांचा संदर्भ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघ यांच्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसंग उजेडात आणला. ९ जानेवारी १९४० रोजी महाराष्ट्रातील कराड (जि. सातारा) येथील संघ शाखेला भेट देतांना डॉ. आंबेडकर यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला व आपुलकीची भावना व्यक्त केली, असे कोविंद यांनी आपल्या भाषणात सांगितले.
-
या भेटीत डॉ. आंबेडकर यांनी संघ कार्यकर्त्यांना आवश्यक असल्यास मदतीचा प्रस्ताव दिला होता. हे विधान त्या काळातील ‘जनता’ या साप्ताहिकात तसेच ‘केसरी’ या मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
-
कोविंद यांनी सांगितले की, “ही घटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समरसता आणि समावेशकतेच्या विचारसरणीचे प्रमाण आहे.” त्यांच्या मते, डॉ. आंबेडकर आणि संघ यांच्यातील ही ऐतिहासिक भेट भारतीय समाजाच्या एकात्मतेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा होती.
-
नागपूर येथील कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देश-विदेशातील मान्यवर उपस्थित होते.
-
यावेळी पारंपरिक शस्त्रपूजा, संघ संचलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. नागपूरच्या रेशीमबाग मैदानात झालेल्या या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिकांनी उपस्थिती लावली.
-
रामनाथ कोविंद यांच्या या भाषणामुळे इतिहासातील एक महत्वाचा पैलू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी आणि संघ यांच्यातील संबंधावर आजवर फारसा प्रकाश टाकला गेला नव्हता. कोविंद यांच्या भाषणामुळे हा विषय नव्याने अभ्यासला जाण्याची शक्यता आहे. तसेच नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरही संघाच्या कामामुळं प्रभावित’, माजी राष्ट्रपतींचं मोठं विधान; वाद होणार?
Ram Nath Kovind on RSS Centenary Celebrations: देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवात हजेरी लावली. महात्मा गांधी संघाच्या कामामुळं प्रभावित झाले होते, असे विधान त्यांनी यावेळी केले.
Web Title: Former president of india ram nath kovind big statement on mahatma gandhi and rss relation on rss centenary celebrations kvg