पिंपरी : भाजपने वर्चस्व निर्माण केलेला एकेकाळचा पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा काबीज करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात दोन दिवस ‘जनसंवाद’, ‘राष्ट्रवादी मीलन परिवार’ कार्यक्रमांतर्गत शहर पिंजून काढले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले.
पिंपरी-चिंचवडवर १५ वर्षे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. महापालिकेवर एकहाती सत्ता होती. शहराची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होती. त्यांच्याच कलाने महापालिकेतील कारभार चालत होता. शहरातील संघटना, महापालिकेतील पदांचे वाटप त्यांच्याच माध्यमातून केले जात होते.
भाजपने २०१७ मध्ये महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता उलथवून कमळ फुलविले. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडली आणि शहरातील बहुतांश माजी नगरसेवक आणि संघटना या अजित पवारांसोबत राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभेला तिन्ही मतदारसंघांतून निवडणूक लढविली. पण, अपयश आले. त्यानंतर पक्षाला गळती लागली. भोसरीतून पक्षाकडून निवडणूक लढविलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात गेले. चिंचवडमधून लढलेले राहुल कलाटे पक्षापासून अलिप्त दिसत आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने शहरावर लक्ष घातले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात जनसंवाद घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. ‘राष्ट्रवादी परिवार मीलन’अंतर्गत अनेकांच्या घरी गेले, जेवण केले. दोन दिवस अजित पवार शहरात तळ ठोकून होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शहरात लक्ष घातले आहे. मंगळवारी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांतून पक्षाच्या उमेदवारांना साडेचार लाख मते मिळाली आहेत. याचाच अर्थ जनमत आपल्या बाजूने आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांबाबत भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. शहरात होणाऱ्या चुकीच्या कामांवर, गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे. जोरदार, परखड भूमिका मांडायला हवी, संघटना बळकट करायला हवी. निवडणुकीसाठी कामाला लागा, लोकांमध्ये मिसळा, अशा सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
महापालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीसोबतच लढण्याचे संकेतही पवार यांनी या वेळी दिले. तसेच माजी महापौर आझम पानसरे यांना विश्वासात घेऊन काम करण्याची सूचना शहराध्यक्ष तुषार कामठे यांना केली.
हर्षवर्धन पाटील यांच्याकडे जबाबदारी
काँग्रेसमध्ये असताना पिंपरी-चिंचवडचे प्रभारी म्हणून काम केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे शहराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचे आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.
शहरात शरद पवार यांनी स्वत: लक्ष घालण्याचे ठरविले आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुढील काळात कसे पुढे जायचे याबाबत मार्गदर्शन केले. शहराच्या जडणघडणीत त्यांनी योगदान दिले आहे. आणखी ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.- डॉ. अमोल कोल्हे, खासदार