पुणे : पुणे जिल्ह्यावर प्राबल्य असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी अजित पवार यांचे विश्वासू साथीदार आणि कट्टर विरोधकांचे मतपरिवर्तन करून त्यांना भाजपवासी करण्याचा डावपेच सुरू असताना आता अजित पवारांनी भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांना पक्षात घेऊन भाजपवर पलटवार केला आहे. शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था दोलायमान झाली असताना काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांऐवजी युवा पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन काँग्रेस आणखी खिळखिळी करण्याचीही व्यूहरचना अजित पवार यांनी आखली आहे. त्याची सुरुवात युवा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे यांना ‘राष्ट्रवादी’त घेऊन केली आहे.

पुण्यात महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमेकांचे पदाधिकारी फोडण्यावरून शीतयुद्ध सुरू आहे. भाजपने अजित पवार यांच्या कट्टर विरोधकांना जवळ करण्याची खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात अजित पवार यांचे प्राबल्य असल्याने आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. थोपटे आणि पवार यांच्यात अनेक वर्षांपासून राजकीय वैर आहे. त्यामुळे थोपटे यांना जवळ केल्यानंतर पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला.

पवार आणि जगताप यांच्यातही फारसे सख्य नाही. इंदापूरमध्ये प्रवीण माने यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने पवार यांचे विश्वासू सहकारी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे. भाजपकडून सातत्याने सुरू असलेल्या कुरघोडी पाहून अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. भाजपचे बारामती विधानसभा मतदार संघााचे प्रभारी आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात घेऊन आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून जिल्ह्यात शिरकाव करण्याचा भाजपचा डाव उधळून लावला आहे.

कामठे हे पूर्वाश्रमीचे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. ते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषद ही ताब्यात ठेवण्यासाठी ५५ पैकी ५३ सदस्य हे राष्ट्रवादीबरोबर राहण्यासाठी कामठे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. कामठे यांचे कोंढवा भागात जनसंपर्क आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेबरोबरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होणार आहे.

काँग्रेस फोडण्यास सुरुवात

पुणे शहरात काँग्रेस थोडीफार तग धरून आहे. जिल्ह्यात भोर आणि पुंरदरमध्ये काँग्रेस लढा देत उभी होती. मात्र, थोपटे आणि जगताप हे भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवार यांनी काँग्रेस आणखी खिळखिळी करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांचा प्रभाव राहिला नसल्याने त्यांना पक्षात घेण्याऐवजी युवा पदाधिकाऱ्यांना प्रवेश देण्याची खेळी पवार यांनी खेळण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात युवा काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे यांच्या पक्षप्रवेशाने केली आहे. त्यांच्यासह युवा काँग्रेसच्या आणखी १५ पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

याबाबत सुरवसे म्हणाले, ‘काँग्रेस पक्षात गेल्या पाच वर्षांपासून निष्ठेने काम करत होतो. मात्र, काँग्रेसमधील गटबाजीमुळे युवा पदाधिकाऱ्यांना कामाची सधी मिळत नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अनुभव मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी काम करणार आहे.’