Modi criticism by congress काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिहारमध्ये ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून ‘वोटर अधिकार यात्रे’चे आयोजन केले आहे. मात्र, या यात्रेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने भाजपा आक्रमक झाला आहे. मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईबद्दलदेखील अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाने गुरुवारी दरभंगा शहरातील पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी, त्यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव हे यात्रेसाठी दरभंगा येथून मोटरसायकलवरून मुझफ्फरपूरला रवाना झाले होते. यापूर्वी निवडणुकांदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांवरून भाजपाने काँग्रेसला घेरले होते, त्यामुळे हा वाद वाढू नये म्हणून काँग्रेस सावध झाला आहे. मोदींबाबत काँग्रेस नेत्यांनी आतापर्यंत कोणत्या आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला? त्याचा काय परिणाम झाला? जाणून घेऊयात…
‘मौत का सौदागर’
२००७ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले होते. २००२ च्या गोध्रा दंगलीसाठी त्यांना जबाबदार धरले होते. मात्र, या वक्तव्यामुळे काँग्रेसला काहीच फायदा झाला नाही आणि भाजपाने १८३ पैकी ११७ जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी विश्लेषकांनी चुरशीची लढत असेल असा अंदाज व्यक्त केला असूनही, काँग्रेसला केवळ ५९ जागांवर समाधान मानावे लागले.
‘चायवाला’
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना मोदींनी लहानपणी चहा विकल्याचे वारंवार सांगितले. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेने काँग्रेसला अडचणीत आणले. पाटणा येथील एका सभेत मोदींनी ट्रेनमध्ये चहा विकणाऱ्यांना रेल्वे मंत्र्यांपेक्षा रेल्वेबद्दल अधिक माहिती असते असे म्हटले होते. त्यावर अय्यर म्हणाले होते, “मी तुम्हाला वचन देतो की, २१ व्या शतकात मोदी कधीही पंतप्रधान होणार नाहीत. पण, जर त्यांना येथे चहा वाटायचा असेल तर आम्ही त्यांना जागा देऊ.”
‘नीच’
२०१७ मध्ये अय्यर यांनी मोदींना ‘नीच किसम का आदमी ‘ असे संबोधले. काँग्रेस आंबेडकरांचा वारसा पुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मोदींनी केला होता. त्यानंतर अय्यर यांनी हे विधान केले होते. अय्यर म्हणाले होते, “मला वाटते की हा माणूस खूप नीच दर्जाचा आहे, त्यांच्यात काहीही सभ्यपणा नाही. अशा वेळी अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण करण्याची काय गरज आहे?” त्यावेळी राहुल गांधी यांनी पक्षाला अय्यर यांच्या विधानांपासून दूर ठेवले आणि त्यांना माफी मागण्यास सांगितले, तसेच अशा प्रकारची वक्तव्ये काँग्रेसच्या संस्कृतीचे प्रतिबिंब नाहीत असे म्हटले.
त्यांच्या वक्तव्यामुळे पक्षातून निलंबित झाल्यानंतर अय्यर म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकर यांच्या केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदी काँग्रेस आणि राहुल गांधींवर का टीका करत होते? दररोज पंतप्रधान आमच्या नेत्यांविरुद्ध असभ्य भाषा वापरत आहेत. मी एक फ्रीलान्स काँग्रेसवाला आहे, माझ्याकडे पक्षात कोणतेही पद नाही, त्यामुळे मी पंतप्रधानांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ शकतो. ‘नीच’ म्हणताना माझा अर्थ ‘लो लेवल’ असा होता,” असेही ते म्हणाले.
त्यांनी पुढे असेही म्हटले की, ते मूळ हिंदी भाषिक नसल्यामुळे त्यांच्याकडून कदाचित त्या शब्दाचा गैरवापर झाला असावा. “जेव्हा मी हिंदी बोलतो तेव्हा मी इंग्लिशमध्ये विचार करतो… त्यामुळे, जर त्या शब्दाचा काही वेगळा अर्थ असेल तर मी माफी मागतो.” अय्यर यांचे निलंबन डिसेंबर २०१८ अखेरीस मागे घेण्यात आले.
‘चौकीदार चोर है’
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर है’ असा नारा दिला. त्यांनी राफेल लढाऊ विमान करारात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. भाजपाने याला ‘मैं भी चौकीदार’ या घोषणेने प्रत्युत्तर दिले. गांधींनी राफेल डीलबाबत त्यांच्या आरोपाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेही पाठिंबा दिल्याचे म्हटले. त्यानंतर भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले आणि राजकीय चर्चांमध्ये न्यायालयाला ओढू नये, असा इशारा दिला.
‘दुर्योधन’
२०१९ च्या निवडणुकीदरम्यान, प्रियंका गांधी वाड्रा यांनी अंबाला येथील एका सभेला संबोधित करताना मोदींची तुलना दुर्योधनाशी केली. मोदींनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले, “एका काँग्रेस नेत्याने मला ‘गंदी नाली का कीड़ा (घाणेरड्या गटारातील किडा)’ म्हटले, दुसऱ्याने ‘गंगू तेली’ म्हटले. एकाने मला ‘वेडा कुत्रा’, दुसऱ्याने ‘भस्मासुर (स्वतःलाच नष्ट करणारा एक राक्षस)’ म्हटले. एका माजी परराष्ट्र मंत्र्याने मला ‘माकड’ म्हटले, दुसऱ्या मंत्र्याने मला ‘व्हायरस’ म्हटले आणि आणखी एकाने माझी तुलना दाऊद इब्राहिमशी केली.” ते पुढे म्हणाले, जेव्हा पक्षाच्या गैरकृत्य आणि घराणेशाहीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, तेव्हा काँग्रेसच्या शब्दकोशातून अशी विशेषणे बाहेर येतात.
‘रावण’
२०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा मोदींवर अवलंबून असल्याबाबत खिल्ली उडवली. ते म्हणाले, “आम्ही प्रत्येक निवडणुकीत मोदींचा चेहरा पाहतो. तुम्हाला रावणासारखी १०० डोकी आहेत का?”
‘विषारी साप’
एप्रिल २०२३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही आठवड्यांपूर्वी खरगे यांनी मोदींना ‘विषारी साप’ म्हटले आणि ते म्हणाले, “जर तुम्ही त्याला चावू दिले तर तुम्ही मरणार.” खरगे यांनी नंतर स्पष्टीकरण दिले की ते भाजपाच्या विचारधारेबद्दल बोलत होते, पंतप्रधानांवर त्यांनी कोणतीही वैयक्तिक टीका केली नाही. भाजपा नेते बसंगौडा पाटील यत्नाल यांनी सोनिया गांधींना ‘विषकन्या’ आणि राहुल गांधींना ‘वेडा’ म्हटले.