छत्रपती संभाजीनगर : कुणीही खंडणी मागण्याच्या प्रकार करू नये अन्यथा मकोका लावायला मागे पुढे बघणार नाही, जे अधिकारी जास्त दिवस एकाच जागी आहेत त्यांची बदली होणार, बंदूक कमरेला लाऊन फिरणाऱ्यांचे परवाने रद्द होणार असे तीन इशारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या बाजूला हाताची घडी घालून उभे होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी आणि नंतर धनंजय मुंडे यांच्या शाररिक हालचाली त्यांना कधी दुय्यम ठरवले असल्याचा संदेश देणाऱ्या होत्या तर कधी आपण पुन्हा यातून बाहेर पडू असे सांगणाऱ्या होत्या. पवार यांच्या या तीन इशाऱ्यांमुळे येत्या काळात राष्ट्रवादीमध्ये बरीच ‘ साफसफाई ’ होईल असे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, मुंडेंचा राजीनामा होणार नाही, असा संदेशही जिल्ह्यातील नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना पहिल्यांदा अटक करण्यात आली. पुढे या लाचेच्या प्रकरणातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यामुळे बीडची धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम झाली. धनंजय मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांचे वर्चस्व जिल्ह्याच्या राजकारणात राहू शकेल, असा दावाही आता केला जात आहे. मात्र, बैठकीमध्ये परळीमधील राख, वाळू उपसा यावर चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. संतोष देशमुख प्रकरणातील धागेदारे किती खोलवर रुजले आहेत, याचा अंदाज घेऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा की नाही याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याने धनंजय मुंडे यांनी हाताची घातलेली घडी त्यांची शरीरभाषा व्यक्त करण्यास पुरेशी असल्याचे अर्थ काढले जात आहेत. दरम्यान बीडमध्ये येऊन अजित पवार यांनी बैठक घेतल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील वातावरण निवळेल, असे मुंडे समर्थक सांगत आहेत.

राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी खंडणी मागण्याचे प्रकार करू नये असा पवार यांचा इशारा असे काम सुरू होते किंवा ते केले आहे, अशा स्वरुपाचा असल्याने राष्ट्रवादीमध्ये साफसफाई होईल असे मानले जात आहे. पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, असेही पवार यांनी सांगितले. काही वर्षे एकाच जागी असणारे अधिकारी बदलेले जाणार असल्याने बीडच्या प्रशासनात काही बदल होतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, धनंजय मुंडे यांना तुर्त तरी राजीनामा देण्याची वेळ येणार नाही, असेच चित्र आता बीडमध्ये त्यांचे समर्थक रंगवू लागले आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed dhananjay munde ajit pawar ncp pankaja munde meeting guardian minister issue walmik karad extortion case print politics news ssb