महाराष्ट्र आणि बिहार निवडणूक निकालांमध्ये अनेक बाबतीत साम्य आढळते. दोन्ही राज्यांमध्ये अनपेक्षितपणे एनडीएला घवघवीत यश प्राप्त झाले असले तरी मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपने वेगळा न्याय लावला आहे. बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद कायम ठेवले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात मात्र भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इच्छा असतानाही त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नाही. परिणामी शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले.

बिहारमध्ये भाजपप्रणित एनडीएने २४३ पैकी २०० पेक्षा अधिक जागा जिंकून निर्विवाद यश प्राप्त केले. महाराष्ट्रात गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २३८ जागा जिंकून एनडीएने असेच यश संपादन केले होते. बिहारमध्ये भाजपला ८९ तर नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला ८५ जागा मिळाल्या. राज्यात भाजपला १३२ तर शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा मिळाल्या होत्या. बिहारमध्ये भाजपचे संख्याबळ नितीश कुमार यांच्यापेक्षा चारने अधिक असून, भाजप सर्वाधिक जागा जिंकलेला पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार यांनाच कायम ठेवले जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे. नितीश कुमार यांच्या सरकारचा येत्या गुरुवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सारी तयारी सुरू झाली आहे.

राज्यात गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली होती. बिहारमध्येही नितीश कुमार यांचा चेहरा होता. पण बिहारच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य कोणत्याही नेत्यांनी पुन्हा सत्तेत आल्यावर नितीश कुमार मुख्यमंत्री होतील, असे सूचक वक्तव्य केले नव्हते. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक दिवस मुख्यमंत्रीपदाचा निर्णयच होत नव्हता. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद हवे होते. आपल्या नेतृत्वाखाली एवढे यश मिळाल्याने मुख्यमंत्रीपद कायम राहावे अशी त्यांची अपेक्षा होती. अनेक दिवस शिंदे हे नाराज होते. शेवटी भाजप नेत्यांनी ही कोंडी फोडली. नाराज शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी झाले.

नितीश आणि शिंदे यांच्यातील फरक

बिहारमध्ये नितीश कुमार यांना दूर करणे भाजपला शक्यच नव्हते. बिहारमध्ये नितीश कुमार ही भाजपची अपरिहार्यता होती. २०२० मध्ये भाजपचे ७४ तर नितीश कुमार यांचे ४३ आमदार निवडून येऊनही मुख्यमंत्रीपद नितीशकुमार यांच्याकडेच कायम ठेवण्यात आले होते. बिहारमधील राजकारणा हे जातींच्या भोवताली केंद्रित झाले आहे. लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव यांच्या यादव – मुस्लीम समीकरणाला छेद देण्यासाठी दुर्बल घटकांचे ध्रुवीकरण करणे हे महत्त्वाचे असते. कुर्मी समाजातील नितीश कुमार यांच्याकडे यादव विरोधी सर्व छोट्या जातीपाती व घटकांना एकत्र करण्याची ताकद आहे. भाजपमुळे उच्चवर्णीयांची साथ मिळते. भाजपकडे दुर्बल घटकांमधील सर्व जातीपातींना एकत्र आणण्याची ताकद नाही. यातूनच नितीश कुमार यांचे महत्त्व अधिक आहे. या तुलनेत एकनाथ शिंदे यांची हक्काची मतपेढी नाही. ठाणे वगळता त्यांचा फारसा प्रभावही नाही. यामुळेच शिंदे यांना दूर ठेवणे भाजपसाठी अवघड नव्हते.