सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भाजप नव्याने बस्तान बसविण्याच्या तयारीत आहे.

माजी खासदार संजयकाका पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर राजकीय पुनर्वसनासाठी त्यांनी भाजपमध्ये घर वापसी करण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यांच्या भाजप प्रवेशाला खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच अप्रत्यक्ष विरोध दर्शवला असला तरी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

या  मतदार संघात पक्षिय स्तरापेक्षा काका-आबा म्हणजेच  संजयकाका पाटील आणि आरआर आबांचे चिरंजीव आमदार रोहित पाटील असे दोनच गट अधिक सक्षम आहेत. या गटांना वगळून भाजपची ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून यासाठी स्वप्नील पाटील व किसान मोर्चाचे पदाधिकारी संदीप गिड्डे पाटील यांना पक्षाकडून आणि पक्ष नेतृत्वाकडून ताकद देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एकेकाळी तासगावचे राजकारण म्हणजे काका-आबांची गटबाजी असेच समिकरण होते. माजी खासदार पाटील यांना एकसंघ राष्ट्रवादीत घेउन विधानपरिषदेचे सदस्यत्वही देण्यात आले. यातून तासगावचा संघर्ष संपुष्टात येईल अशी अपेक्षा होती. मात्र, काही काळच राजकीय वातावरण शांत राहिले. मात्र, तासगाव कारखान्याच्या विषयावरून अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरूच राहिले.

यातच मोदी लाटेमध्ये काकांनी भाजपमध्ये प्रवेश करत खासदारकीची उमेदवारी मिळवली. यानंतर सलग दोन निवडणुकीमध्ये ते विजयी झाले. यामुळे भाजपमध्ये त्यांची चलती  होती. निष्ठावंत भाजप नेतृत्वाकडून त्यांना डावलण्याचे प्रयत्न झाले असले तरी पक्षाकडे जनमाणसात मिसळणारे नेतृत्वच नसल्याने भाजपकडेही पर्याय उरलेला नव्हता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर पक्षानेही त्यांची फारसी तमा बाळगली नाही.

यातूनच विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले. तथापि, जागा वाटपात  तासगावची जागा राष्ट्रवादी  कॉग्रेस (अजित पवार) पक्षाला सोडण्यात आली. यामुळे त्यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली. पक्ष फुटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली ही एकमेव लढत होती. रोहिेत पाटील यांनी ती जिंकली. यानंतर माजी खासदार पाटील राजकीय विजनवासातच गेले आहेत. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय कार्यातही ते सक्रिय असल्याचे दिसत नाहीत. यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय हे अस्पष्ट आहे.

मध्यंतरी त्यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केले. मात्र, पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद  मिळाला नाही. पालकमंत्री पाटील यांनी तर त्यांचे राजकीय पूनर्वसन करण्याची जबाबदारी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांची असल्याचे सांगून त्यांच्या  भाजप  प्रवेशाला खो घातला. विधानसभा निवडणुकीत  त्यांच्यासोबत असलेले कवठेमहांकाळचे अजितराव घोरपडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सक्रिय आहेत. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी तासगावमध्ये या पक्षाकडून फारसे प्रयत्न दिसत नाहीत.

डॉ. प्रताप पाटील हे सक्रिय असले तरी पक्षाला त्यांचा फारसा लाभ होईलच अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. माजी खासदारांना  उणे करून तासगावमध्ये पक्ष बाळसे धरेल असे वाटत नाही. या राजकीय परिस्थितीत भाजप मात्र नव्याने पक्षाची बांधणी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. संदीप गिड्डे पाटील यांच्या माध्यमातून बैलगाडी शर्यती, दहीहंडी या माध्यमातून तरूणाईला साद घालण्याचे प्रयत्न झाले. तसेच पवनउर्जा प्रकल्पासाठी खासगी खरेदी करण्यात आलेल्या जमिनी मूळ शेतकर्‍यांनाच मिळाव्यात यासाठीही प्रयत्न भाजपने गिड्डे यांच्या माध्यमातून सुरू केले आहेत.

वाघोली येथे झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची बैठक होउन या प्रयत्नांना संघटित स्वरूप देउन घाटमाथ्यावर आणि तासगावमध्ये स्वप्नील पाटील यांच्या माध्यमातून भाजपची ताकद संघटित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे या मतदार संघात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप विरूध्द राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष यांच्यात होतील असे दिसत असले तरी माजी खासदार पाटील यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.