नांदेड: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत गेल्या सोमवारी भाजपामध्ये फेर प्रवेश करणारे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी त्याच दिवशी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेश कार्यालयाकडे पाठविल्याचे समोर आले आहे.
त्यापूर्वी आधीच्या आठवड्यात सावंत यांनी आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचे इथे सांगितले होते. पण नंतर ‘यु टर्न’ घेत ते म्हणाले होते की, गेल्या नोव्हेंबर महिन्यात खासदार अशोक चव्हाण यांच्या घरी माझ्या गळ्यात भाजपाची उपरणे टाकण्यात आले. तेव्हापासून मी भाजपात आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार असे दिसते की, सावंत हे नोव्हेंबर ते मे यादरम्यान काँग्रेस सोबत भाजपामध्येही होते. पण त्याची दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली नाही. भाजपच्या गेल्या आठवड्यातील जाहीर सभेच्या व्यासपीठावर ते दिसले तेव्हा ते भाजपात गेले आहेत, हे स्पष्टच झाले होते ; पण सभेच्या शेवटी ज्या प्रवेशार्थींची नावे जाहीर झाली, त्यात पहिल्या क्रमांकावर त्यांच्या नावाचा पुकारा झाला. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या गळ्यात नवे उपरणे टाकले तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले.
भाजपातील फेर प्रवेशाच्या दिवशीच म्हणजे, २६ मे रोजी सावंत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे आपले राजीनामा पत्र पाठविल्याचे ही आता स्पष्ट झाले आहे. सपकाळ बुधवारी नांदेड मध्ये आले होते. त्यांनी सावंत आणि बी. आर. कदम या दोघांचे राजीनामापत्र उपस्थित वार्ताहरांना दाखविले.
‘तो’ प्रवेश घरगुती होता
२६ मे रोजी आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठविला आणि नंतर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. आधी म्हणजे नोव्हेंबर मध्ये गळ्यात उपरणे घालण्यात आले होते. तो केवळ घरगुती प्रवेश होता. आता मी भाजप सदस्यत्वही स्वीकारणार आहे.
डी.पी.सावंत, माजी राज्यमंत्री