मुंबई : ब्राह्मण समाजासाठी असलेल्या ‘ परशुराम आर्थिक विकास महामंडळा ‘ च्या अध्यक्षपदी कँप्टन आशिष दामले यांची नियुक्ती केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने पदभार न स्वीकारण्याच्या सूचना दामले यांना देण्यात आल्या आहेत. नव्याने सरकार आल्यावर या नियुक्तीबाबत निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भटजी आणि शेठजींचा पक्ष अशी एकेकाळी ओळख असलेल्या भाजपने महायुतीच्या वाटपात परशुराम महामंडळ राष्ट्रवादी काँग्रेसला का व कसे दिले, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दामले यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती आणि कालांतराने मुक्तता झाली होती. वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या दामले यांची महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी फडणवीस यांची संमती घेण्यात आली नव्हती. निवडणूक आचारसंहिता लागू होण्याआधी घाईघाईने या नियुक्त्या करण्यात आल्या. दामले यांच्यासंदर्भात माहिती मिळाल्यावर फडणवीस यांनी पवार यांच्याशी चर्चा करून नापसंती व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दामले यांच्या नियुक्तीबाबत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळातही नाराजी आहे.

हेही वाचा : “लॉरेन्स बिश्नोई व केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीतरी शिजतंय”, पंजाब काँग्रेसचा गंभीर आरोप!

या महामंडळासाठी राज्य सरकार पन्नास कोटी रुपये भागभांडवल देणार आहे. महायुतीच्या वाटपात हे महामंडळ भाजपकडे राहणे अपेक्षित होते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकल्या असून त्या केवळ कागदावर उरल्या आहेत. नवीन सरकार सत्तेवर आल्यावर या नियुक्त्या पुन्हा होतील. महायुती पुन्हा सत्तेवर आल्यास नवीन नावाचा विचार होईल, असे सूत्रांनी नमूद केले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis displeasure with ajit pawar over appointment of president of brahmin samaj mahamandal print politics news css