हर्षद कशाळकर, लोकसत्ता
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सत्ताधारी पक्षातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपमुळे कोंडी झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजप विरोधात मोहीम उघडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मतदारसंघात सत्ताधारी महायुतीतील शिवसेना भाजप आमने सामने येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
अलिबाग विधानसभेतील ३६ ग्रामपंचायतींसाठी निकतीच निवडणूक प्रक्रीया पार पडली. या निवडणुकीत भाजपन स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली. दोघांच्या भांडणात शेकापचा लाभ झाला. भाजपच्या उमेदवारांमुळे शिवसेना शिंदेगटाच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी थोडक्या मतांनी पाडाव झाला. त्यामुळे दोन्ही सत्ताधारी गटात वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना शिंदे गटाने आक्रमक होत आता भाजपवर थेट निशाणा साधला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप ही शेकापची दुसरी फळी म्हणून कार्यरत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांना केला आहे. रायगडची लोकसभेची जागाही शिवसेनेनीच लढवावी अशी थेट मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.
आणखी वाचा-मराठा आरक्षण दिल्यावर मनोज जरांगेंचे नेतृत्व संपुष्टात? भाजप नेत्यांची अटकळ
जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून काम केलेल्या दिलीप भोईर यांनी काही महिन्यांपूर्वीच शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांनी स्वबळ आजमावण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेशी फारकत घेत, त्यांनी ठिकठिकाणी आमले उमेदवार उभे केले. मुरूड मध्ये दोन ग्रामपंचायती त्यांनी जिंकल्या, पण अलिबाग मध्ये एकही ग्रामपंचायत भाजपला ताब्यात घेता आली नाही. पण भाजपच्या उमेदवारांमुळे शिवसेना शिंदेगटाचे उमेदवार थोडक्यात पडले. ग्रामपंचायत निवडणूकीतील हा पराभव शिंदे गटाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे भाजपला थेट आव्हान देत स्वबळावर मोर्चे बांधणी करण्याची तयारी शिवसेनेनं सुरू केली आहे.
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात तसे संकेत दिले आहेत. मतदारसंघात शिवसेनेला इंडीया आघाडी अथवा शेकापचे आव्हान नाही. खरे आव्हान हे मित्र पक्ष असलेल्या भाजपचे आहे. हीच परिस्थिती राहिली तर पक्षाला वेगळा विचार करावा लागेल. भाजपने आडमुठी भुमिका घेतली असली तरी, त्यात त्यांचेही नुकसान झाले. भाजपकडे होत्या त्या ग्रामपंचायती पक्षाने गमावल्या. उलट शिवसेनेनी स्वबळावर निवडणूक लढवून सर्वाधिक सदस्य निवडून आणले. शेकापकडे असलेल्या ग्रामपंचायती शिवसेनेने घेतल्या. त्यामुळे जनतेचे पाठबळ शिवसेनेच्या बाजूनेच आहे. भाजपने समन्वयाची भुमिका घेतली नाही, तर येणाऱ्या ३२ ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूका स्वबळावर लढवण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल असा इशारा आमदार दळवी यांनी दिला. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे.
आणखी वाचा-“माझ्या वडिलांचे सरकार पुन्हा येणार नाही”, गहलोत यांच्या मुलाच्या तथाकथित वक्तव्याचा भाजपाकडून वापर
महायुतीतील तीन पक्षात समन्वय वाढावा यासाठी गेल्या महिन्यात मुंबईत दोन बैठका झाल्या होत्या. यात सत्ताधारी घटक पक्षातील मतभेद दूर करण्याचे प्रयत्न झाले होते. पण तरीही ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ताधारी पक्ष एकमेकांविरोधात लढले. त्यामुळे या पक्षामधील कुरबुरी अधिकच वाढल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात उभा वाद पहायला मिळाला होता. या वादामूळेच पूढे सत्तासंघर्ष होऊन महाविकास आघाडी सरकारचे पतन झाले होते. आता महायुतीत शिवसेना आणि भाजप वादाची ठिणगी पडली आहे. या वादावर वेळीच पडदा पडला नाही तर जिल्ह्यात सत्ताधाऱी पक्षातील वादाचा दुसरा अंक सूरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.
