राजेश्वर ठाकरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : कसबा पोटनिवडणूक आणि त्यापूर्वी नागपूर शिक्षक, अमरावती पदवीधर मतदासंघात विजय प्राप्त केल्यानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला असला तरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची अधिसभा निवडणूकही आघाडीने एकजुटीने लढण्याचे ठरवले खरे पण खुल्या प्रवर्गातील पाच जणांवर कोणी लढावे याबाबत एकमत न होऊ शकल्याने पाच जागेसाठी सहा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत मतभेद दिसून येत आहेत.

हेही वाचा >>> ‘शिवगर्जने’त राणा दांम्‍पत्‍यच लक्ष्य

विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पाच आरक्षित जागा आणि पाच खुल्या प्रवर्गातील जागांसाठी निवडणुका होत आहेत. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष तसेच समविचारी पक्ष एकत्रित निवडणूक लढत आहेत. त्यासंदर्भातील घोषणा अलीकडेच डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली. या आघाडीत यंग टिचर्स असोसिएशन, सेक्युलर पॅनेल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेना, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स ऑर्गनायझेशन आणि इतर धर्मनिरपेक्ष व आंबेडकरी संघटनांचा समावेश आहे.

आघाडीत ठरल्याप्रमाणे दहा जागांपैकी शिवसेना (उद्धव ठाकरे) तीन आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सात जागांवर उमेदवार देणार आहेत. पण दावेदारांची संख्या अधिक असल्याने आघाडीत एकमत होऊ शकले नाही. मात्र, त्यामुळे खुल्या प्रवर्गात पाच जागांसाठी आघाडीचे सहा उमेदवार रिंगणात राहणार आहेत.

हेही वाचा >>> के कवितांनी दाखवला काँग्रेसला आरसा, एकत्र येण्याचे आवाहन करत म्हणाल्या, “तुमच्याकडे फक्त ६००…”

खुल्या प्रवर्गात महाविकास आघाडीचे मनमोहन वाजपेयी, हेमंत सोनारे, अमित काकडे, प्रवीण भांगे, माधुरी पालिवाल, प्रवीण उदापुरे आणि राखीव प्रवर्गात किरण अजबले (महिला), दिनेश धोटे (ओबीसी), कुणाल पाटील (एससी), मुकेश पेंदाम (एसटी), खिमेश बढिये (एनटी) अशाप्रकारे एकूण १० जागांसाठी ११ उमेदवार आघाडीचे आहेत. यासंदर्भात आमदार ॲड. अभिजीत वंजारी म्हणाले, आघाडीच्या मतांचे विभाजन होऊ नये म्हणून अधिकाचा उमेदवार देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. या निवडणुकीत मतदारांना पसंतीक्रम द्यायचा असतो. आघाडीच्या मतदारांना पसंतीक्रम देण्यासाठी एक अधिकचा पर्याय देण्यात आला. त्यामुळे मतांचे विभाजन होणार नाही आणि आघाडीचे सर्व दहाही उमेदवार विजयी होतील.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute in maha vikas aghadi over nagpur university senate election print politics news zws