संजीव कुळकर्णी, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नांदेड : भाजपाच्या प्रचारात नागपूर ते गोवा ह्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा डंका वाजवला जात असताना हा महामार्ग भाजपाचे नवे खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील शेतकर्‍यांवर जबर घाव घालणारा असल्याची संतप्त भावना मालेगाव भागातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ नरसी येथे गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात समृद्धी महामार्गाला जोडणार्‍या नांदेड-जालना द्रुतगती महामार्गासोबत वरील शक्तिपीठ महामार्गाचेही गोडवे गायले; पण ज्या अर्धापूर तालुक्यात भाजपा आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे, त्या भागातील शेतकर्‍यांच्या मनात वरील महामार्गाबद्दल कडवट भावना निर्माण झाली आहे. याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो.

मालेगाव येथील प्रगतीशील शेतकरी सतीश कुलकर्णी यांनी समाजमाध्यमांतून या विषयाला सर्वप्रथम वाचा फोडली. याच परिसरात चव्हाण कुटुंबाची शेतजमीन असली, तरी शक्तिपीठ महामार्गामुळे पुढील काळात निर्माण होणार्‍या प्रश्नांमध्ये चव्हाण यांनी आतापर्यंत आस्था दाखविलेली नाही, असे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर गेल्या मंगळवारचा पाडवा बाधित शेतकर्‍यांसाठी भविष्यातील चिंतेची जाणीव करून देणारा ठरला.

आणखी वाचा-मतदारसंघाचा आढावा : चंद्रपूर- काँग्रेसच्या ताब्यातील मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांची कसोटी

यासंदर्भात सतीश कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, मालेगाव येथील स्वतःच्या जमिनीत फुलविलेले नंदनवन आता उघड्या डोळ्यांनी उद्ध्वस्त झालेले पाहण्याची वेळ गडकरी-फडणवीस यांच्या सरकारने आणली आहे. चिंचेचे महाकाय वृक्ष, निळ्याशार-गोड पाण्याच्या विहिरी, त्यात झुकलेल्या झाडांच्या फांद्यांवरील पक्ष्यांची घरटी, रसदार उसाचे मळे, केळीच्या बागा हे सारे काही महिन्यांचे सोबती आहेत, ही बाब संवेदनशील मनांची चिंता वाढविणारी आहे.

अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, भोगाव, उमरी, देगाव आदी वेगवेगळ्या गावांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणार असल्याचे समोर आले आहे. नागपूर-गोवा हा ८०५ कि.मी.लांबीचा, ८६ हजार कोटी खर्चाचा शक्तिपीठ महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांच्या २७ हजार एकर शेतीची धुळधाण करणारा आहे. समृद्धीसारख्या महामार्गाला समांतर असणारा हा ‘शक्तिपीठ’ केवळ कंत्राटदाराच्या भल्यासाठीच असावा, अशी दाट शंका आहे.

आणखी वाचा-परभणीच्या प्रचारात जातीय ध्रुवीकरणाचा धुराळा

निवडणुकीच्या धामधुमीत या असहाय शेतकर्‍यांकडे कुणाचेच लक्ष नाही. आता ही लढाई त्यांनाच लढावी लागणार आहे. संघटित होऊन महामार्ग रद्द करा या मागणीशिवाय पर्याय नाही, अन्यथा घात निश्चित असल्याची जाणीव कुलकर्णी यांनी शेतकर्‍यांना करून दिली आहे.

वरील महामार्गाकरिता भूसंपादनाची प्रक्रिया करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एक अधिसूचना जारी झाली आहे. त्यावर ज्योती सतीश कुलकर्णी यांच्यासह सुमारे १०० शेतकर्‍यांनी आक्षेप दाखल केले आहेत. द्रुतगती मार्गामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांचा न्याय्य मावेजासाठी लढा सुरू असताना, ‘शक्तिपीठ’ने आणखी एका लढ्याची वेळ आणली आहे. पश्चिम महाराष्ट्रात या महामार्गाविरुद्ध लढा सुरू झाला आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dissatisfaction in ashok chavans sphere of influence due to shaktipeeth highway print politics news mrj