परभणी सेनेची ताकद असल्याने बंडाळीची परिणामकारकता शून्य;औरंगाबाद, उस्मानाबादमधील बंडाळीला स्थानिक कारणेही

मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी या तीन जिल्ह्यांत शिवसेनेची ताकद एकवटलेली आहे.

cm eknath shinde trying to build loyal force by funding Sugar factory and yarn mill in marathwada
साखर कारखाना, सूत गिरणी आणि निधीवाटपातून मुख्यमंत्री शिंदे यांची मराठवाड्यात नवी बांधणी

सुहास सरदेशमुख

मराठवाड्यात औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणी या तीन जिल्ह्यांत शिवसेनेची ताकद एकवटलेली. त्यात फक्त परभणी जिल्ह्यातील शिवसेना पूर्णत: उद्धव ठाकरे यांच्यासमवेत राहिल्याचे चित्र आतापर्यंतच्या राजकीय घडामोडीतून दिसून येत आहे. १९८९ पासून परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. दरवेळी लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदाराने अन्य पक्षात प्रवेश केल्यानंतरही परभणीतील मतदार धनुष्यबाणाच्या बाजूनेच उभे राहिले. उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र या वेळी सेनेचा किल्ला ढाळसला. तानाजी सावंत व ज्ञानराज चौगुले हे दोन आमदार शिंदे गटात गेले. मात्र खासदार ओम राजेनिंबाळकर व कैलास पाटील मात्र शिवसेनेतच थांबले. या जिल्ह्यातील राजकारणाचा पोत राणाजगजितसिंह विरुद्ध सारे असा आहे. सध्या राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे लढत भाजपशी होणार असल्याने ओम राजेनिंबाळकर व कैलास पाटील यांनी शिवसेनेत राहणे पसंत केल्याचे सांगण्यात येते.

औरंगाबाद जिल्ह्यातील सेनेला मोठे खिंडार पडले. कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाठ हे पाच आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यातील संदीपान भुमरे यांना रोजगार हमी हे खाते मिळाले होते. कोविडकाळातही ज्या विभागाचा निधी कपात झाला नव्हता. महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना भुमरे यांची निवडून येण्याची क्षमता चांगली असली, तरी त्यांच्या प्रशासकीय वकुबावर प्रश्नचिन्ह लावले जात होते. असे असतानाही त्यांना मिळालेले कॅबिनेट मंत्रिपद हा त्यांचा सन्मान वाढविणारे असल्याची चर्चा होती. तरीही ते शिंदेगटात सहभागी का झाले असावेत, अशीची चर्चा सुरू झाली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाण्यास पूर्वीच इच्छुक होते. मात्र, तेव्हा त्यांना जाता आले नाही. त्यामुळे वेळप्रसंगी ते शिवसेनेतून उडी मारतील याचा अंदाज सेनेतील वरिष्ठ नेत्यांना होता. त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केलेली मते व वक्तव्ये फारशी गांभीर्याने घेऊ नका, असे आवर्जून सांगितले जाई. मात्र, नोकरशाहीतील काही नियुक्त्यांवर त्यांचा वरचष्मा होता. सेनेत त्यांना मिळणारी वागणूकही बदलू लागली होती. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही त्यांच्याशी अलिकडेच जुळवून घेतले होते. मात्र, प्रा. रमेश बोरनारे व प्रदीप जैस्वाल यांचा शिंदेगटातील सहभाग नेमका कोणत्या कारणासाठी याचा उलगडा न झाल्याने शिवसेनेमध्येही संभ्रम आहे.

उस्मानाबाद व परभणीतील मतदार शिवसेनेमधून नेते बाहेर पडले, तरी धनुष्यबाणालाच मतदान करतात हे माहीत असल्याने खासदार संजय जाधव व ओम राजेनिंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर वर्षा बंगल्यावरच असल्याचे दिसून आले. स्थानिक राजकारण, मतदारांचा कौल लक्षात घेत उस्मानाबाद व परभणीतील नेते शिवसेनेमध्ये कायम राहिले. सेनेतील बंडाळीमध्ये शिंदे गटात सहभागी होण्यात पुढाकार घेणारे तानाजी सावंत हे पूर्वीपासून पक्ष नेतृत्वावर नाराज होते. शिवसैनिकांसाठी जीव तळमळतो असे ते भाषणात सांगत असले, तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणावर केवळ स्वत:ची पकड राहावी अशी त्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. ताकद असल्याने परभणी जिल्ह्यात मात्र सेनेच्या बंडाळीचा काही एक परिणाम जाणवला नसल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Effect of internal dispute of shivsena will be different in different parts of marathwada print politics news pkd

Next Story
राहुल गांधी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले विपश्यनेचे महत्व
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी