जळगाव : पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकरावरील जमिनीच्या व्यवहारावरून पार्थ पवार पर्यायाने उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत सापडले आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

फडणवीस यांच्यावर छळ केल्याचा तसेच आपली राजकीय कारकीर्द संपवल्याचा आरोप करत एकनाथ खडसे यांनी काही वर्षांपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. तेव्हापासून खडसे आणि फडणवीस यांच्यातील संबंध ताणले गेले. भाजपमधून बाहेर पडल्यानंतरही खडसेंनी फडणवीसांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी खडसेंनी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेऊन पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्याची धुरा सांभाळणारे फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या तीव्र विरोधामुळे खडसेंचा भाजप प्रवेश रखडला. त्यामुळे खडसे विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसमध्ये परतले.

दरम्यान, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर खडसेंनी सौम्य भूमिका घेतल्याचे दिसून आले. फडणवीस यांच्याशी व्यक्तिगत वैर कधीच नव्हते, भूतकाळात जे काही घडले ते राजकीय परिस्थितीमुळे घडले. आजच्या परिस्थितीत राजकारणातील वैरभाव कायम ठेवून चालत नाही. फडणवीस यांच्याशी फक्त तात्विक मतभेद होते, ते आजही कायम आहेत. मात्र, आमच्यात तणाव राहिलेला नाही. आणि आम्ही भारत-पाकिस्तानसारखे शत्रू नाही. आम्ही एकमेकांशी बोलतो, चर्चा करतो. विरोधी पक्षाची भूमिका असेल तेव्हा ती प्रामाणिकपणे मांडतो. परंतु, यात व्यक्तिगत दुश्मनीचा प्रश्न कधीच नव्हता. भूतकाळात घडलेल्या गोष्टी राजकीय होत्या. त्यामुळे सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये फडणवीस आणि आपल्यात संवाद राहील, असे खडसे यांनी स्पष्ट केले होते. राजकीय जीवनात मतभेद स्वाभाविक असल्याचे सांगत फडणवीस आणि त्यांच्यातील दिलजमाईचे संकेत त्यांनी फेटाळले होते.

त्यानंतर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याची संधी खडसे यांनी साधली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ४० एकरावरील जमीन खरेदी प्रकरण त्यास निमित्त ठरले आहे. या निमित्ताने खडसे यांनी भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी त्यांना कसे विरोधकांकडून घेरण्यात आले होते आणि मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले होते, या कटू आठवणींना उजाळा दिला. महसूल मंत्री असताना आपल्या कुटुंबावर बरेच आरोप झाले. वास्तविक जमीन खरेदी प्रकरणाशी आपला थेट संबंध नव्हता. तरीही त्यावेळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे नाव जमीन खरेदी प्रकरणात समोर आले असतानाही आपल्यावर त्यावेळी आरोप करणारे शांत बसले आहेत. वैयक्तिक देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर सुमारे ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. आता त्याच पवारांबरोबर ते सत्तेत बसले आहेत. मग त्यांच्या मुलाच्या चौकशीचे काय होणार, असाही सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे.