संजीव कुळकर्णी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदेड : २०१९ साली महाविकास आघाडी सरकारची जुळवाजुळव चाललेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी केलेले बंड आणि त्यातून आलेले फडणवीस-पवार सरकार अयशस्वी करण्याच्या  मोहिमेत इतर नेत्यांसोबत एकनाथ शिंदेही ‘आघाडीवीर’ होते. मुंबई विमानतळावरून पळून जाणार्‍या एका अजित पवार समर्थक आमदाराला ताब्यात घेत शिंदे यांनी नंतर हा आमदार शरद पवार यांच्या स्वाधीन केल्याचीही नोंद सापडते. 

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळासह माध्यमांमध्येही मोठी खळबळ उडालेली असताना हा इतिहासही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हेही वाचा >>> मित्रपक्षांवर दबावासाठी पुण्यात राष्ट्रवादीकडून स्वबळाची चाचपणी?

महाविकास आघाडीच्या सरकारमुळे शिवसेना आमदारांची कोंडी होत होती, असे कारण पुढे करून शिंदे यांनी जून महिन्यात केलेल्या बंडानंतर राज्यात सत्ता परिवर्तन घडले . या बंडामुळे मुख्यमंत्रीपद सोडण्याची नामुष्की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आली होती. या बंडादरम्यान शिंदे व त्यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा संपूर्ण ठपका पक्षप्रमुख ठाकरे यांच्या पदरात टाकला. 

या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तांतरानंतर प्रसिद्धी माध्यमांपासून दूर असलेल्या अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे व इतर शिवसेना नेत्यांच्या एका जुन्या भेटीचा संदर्भ देत, भाजपला बाजूला ठेऊन महाविकास आघाडीचे सरकार आणण्याची शिंदे यांची २०१९ पूर्वीची मोठी योजना उघड केल्यानंतर भाजपतही शिंदे यांच्याविषयी संशयाचे वातावरण तयार झाल्याचे या पक्षाच्या एका आमदाराने नमूद केले. 

२०१५ ते २०१९ दरम्यान शिवसेना भाजपसोबत सत्तेत असताना शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्याचा देवेन्द्र फडणवीस यांचा मनोदय होता. पण ठाकरेंनी ते होऊ दिले नाही, असे एकनाथभाई अलीकडेच म्हणाले होते. त्यानंतर आता फडणवीसांचे त्यावेळचे आसन डळमळीत करण्याचा उद्योग शिंदे यांनी केला, ही बाब अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये उघड केली. विशेष म्हणजे त्यांच्या या दाव्याला सेना खासदार विनायक राऊत यांनीही गुरूवारी दुजोरा दिला. 

हेही वाचा >>> औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध

एकनाथ शिंदे यांना खरेच महाविकास आघाडी नको होती का, याचे होकारार्थी उत्तर कुठे सापडत नाही. उलट फडणवीस व अजित पवार यांचे भल्यापहाटे स्थापन झालेले सरकार अल्पजीवी करण्याच्या त्यावेळच्या सर्व घडामोडींमध्ये शिंदे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आघाडीवर होते.   अजित पवारांच्या बंडात सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या १२ पैकी बहुतांश आमदारांनी दुसर्‍याच दिवशी माघार घेतली. याच बंडातील एका आमदारास मुंबईत विमानतळाजवळच्या एका हॉटेलवरून पकडण्याच्या मोहिमेत एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर सहभागी होते. या आमदारास त्यांनी आपल्या गाडीत बसवून नंतर यशवंतराव चव्हाण केंद्रात शरद पवार यांच्यासमोर उभे केल्याची दृश्ये महाराष्ट्राने वृत्तवाहिन्यांवर पाहिली होती.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde involved to failed 2 term of devendra fadnavis government with ajit pawar print politics news zws
First published on: 29-09-2022 at 15:27 IST