नितीन पखाले
यवतमाळ : विधान परिषदेचे आमदार डॉ. वझाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाख रूपयांची लाच घेताना २८ मार्चला नागपूर येथे एका सरकारी कर्मचाऱ्यासह तथाकथित शिक्षक नेत्यास रंगेहाथ पकडण्यात आले होते. विधिमंडळात प्रश्न न विचारण्यासाठी ही लाच घेतल्याची चर्चा असूनही या गंभीर प्रकाराकडे सत्ताधारी भाजपसह आ. मिर्झा यांच्या काँग्रेस पक्षानेही मौन धारण केले आहे.
एका गंभीर प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात असलेले आमदार वझाहत मिर्झा बुधवारी पुसदमध्ये थेट अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांसमवेत एकाच मंचावर दिसल्याने आश्चर्य व्यक् होत आहे. बुधवारी सायंकाळी पुसद येथे रोजा इफ्तार सर्वधर्मीय संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे आणि यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड उपस्थित होते. त्यांच्या समवेत पुसदकरांना या लाच प्रकरणामुळे चर्चेत आलेले आमदार वझाहत मिर्झा यांचे शहरात प्रथमच दर्शन झाले. नागपूर पोलीस आमदार वझाहत मिर्झा यांची चौकशी करत असल्याचे वारंवार माध्यमांना सांगत असताना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे आणि यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड हे आमदार मिर्झा यांच्यासमवेत एकाच मंचावर आल्याने ते कितपत संयुक्तिक होते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा… भ्रष्टाचाराबद्दल मोदी बेफिकीर!, सत्यपाल मलिकांचा खळबळजनक आरोप
आनदार मिर्झा यांच्या नावाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला लाच मागणाऱ्या दिलीप खोडे याच्यासह तथाकथित शिक्षक नेता व राजकीय कार्यकर्ता शेखर भोयर या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आमदार मिर्झा यांची चौकशी अपेक्षित होती. मात्र पोलिसांकडून ही चौकशी अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे या प्रकरणात दिल्लीतून तर काही निर्देश मिळाले नाही ना, अशी चर्चा आहे. डॉ. वझाहत मिर्झा हे काँग्रेसचे आमदार असताना राज्यात सत्ताधारी भाजपने या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावात ही घटना घडून त्यांच्याकडूनही काहीच प्रतिक्रिया नाही. शिवाय काँग्रेसच्या अर्धा डझन पदावर विराजमान असलेल्या मिर्झा यांच्या नावे तब्बल एक कोटींची लाच मागण्याचा प्रकार घडून काँग्रेस पक्षानेही मिर्झा यांना साधा खुलासा मागू नये, याबाबतही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे.
हेही वाचा… शिवसेनेचा नाशिकमध्ये महिला मेळावा, रश्मी ठाकरे यांना विनंती
लाचेसारख्या प्रकारात एका लोकप्रतिनिधीमुळे संवैधानिक संस्थेचे नाव खराब होत असताना सत्ताधारी व विरोधक दोन्हींनाही गप्प बसविण्यात डॉ. वझाहत मिर्झा यांचे अलिकडे भाजपशी जवळीक वाढविलेले दिल्लीतील ‘गॉडफादर’ तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.