पिंपरी : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देण्याची जोरदार चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी गुगली टाकली. आयात उमेदवार करण्यापेक्षा भाजपचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्याची मागणी करत अप्रत्यक्षपणे आढळरावांना विरोध केला. तर, अजित पवारांनाही कोंडीत टाकले. लांडगे लोकसभेत गेले तरच आपला विधानसभेचा मार्ग मोकळा होईल, यासाठीच लांडे यांनी अशी मागणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघ येतो. विलास लांडे यांनी २००९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढविली होती. २०१९ मध्येही त्यांनी जोरदार तयारी केली. परंतु, ऐनवेळी शिवसेनेतून आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाल्याने त्यांची संधी हुकली. लांडे आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे हे जवळचे नातलग आहेत. लांडे हे २००४ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्या रिक्त जागी लांडगे हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कालांतराने महापालिकेतील पद देण्यावरून त्यांच्यात राजकीय वितुष्ट आले. लांडगे यांनी २०१४ मध्ये अपक्ष आणि २०१९ मध्ये भाजपकडून लढत सलग दोनवेळा लांडे यांचा विधानसभेला पराभव केला. लांडगे यांचा मतदारसंघात मोठा करिष्मा असून तिसऱ्या वेळीही निवडून येण्यासाठी त्यांना अडचण दिसत नाही. लांडगे हे लोकसभेत गेले तरच आपल्याला संधी असल्याचे मागील दहा वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले लांडे हे जाणून आहेत.
हेही वाचा… सोलापूरमध्ये मंगळवेढा-करमाळ्यात पाण्याचा मुद्दा भाजपसाठी तापदायक ठरणार ?
आमदार लांडगे यांचीही दिल्लीत जाण्याची तीव्र इच्छा आहे. २०१९ पासून ते तयारी करत असून, युतीमध्ये संधी मिळत नाही. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला लोकसभेची उमेदवारी देत नसाल तर आयात उमेदवार देऊ नका, भाजपचे आमदार लांडगे यांना उमेदवारी द्यावी. त्यांचे काम करायला मी तयार आहे. भोसरीत मी आणि लांडगे एकत्र आलो तर कुठेही अडचण येणार नाही. आम्ही एकतर्फी निवडणूक काढू, असा विश्वास व्यक्त करत लांडे यांनी आढळराव यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. तसेच अशी मागणी करत आमदार लांडगे यांच्याशीही जुळवून घेण्याचे संकेत दिले. दोघेही महायुतीत एकत्र असलेल्या पक्षासोबत आहेत. त्यामुळे आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करूनच लांडे यांनी आमदार लांडगे यांच्यासाठी लोकसभेच्या जागेची मागणी करत जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहराच्या राजकारणात रंगली आहे.
हेही वाचा… यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध
लांडे यांच्या या भूमिकेमुळे लांडगे यांच्याशी असलेला राजकीय वादही संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. आता शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीत कोणाला सुटतो. कोणाला उमेदवारी मिळते. लांडे यांच्या खेळीला यश येते का, हे आगामी काही दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, विलास लांडे यांनी कोणालाही उमेदवारी दिली, तरी माझी हरकत नसल्याचे सांगितल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे पवार यांनी लांडे यांच्या आमदार लांडगे यांना उमेदवारी देण्याच्या मागणीतील हवा काढली आहे.