पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंतर काँग्रेसनेही शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भोसरी आणि पिंपरीवर हक्क दाखविला असल्याने शहरातील तिन्ही मतदारसंघांमध्ये तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडवण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर उभे राहिले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे शहरात मेळावे झाले. विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले, उपमुख्यमंत्री पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी समर्थक माजी नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केल्याने भोसरी मतदारसंघ पवार गटाला सुटण्याची चर्चा सुरू झाली. परिणामी, ठाकरे गटाचे भोसरीतील पदाधिकारी अस्वस्थ असून, भाजपचे माजी नगरसेवक रवि लांडगे यांनीही खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. शरद पवार यांचा यंदा ८५ वा वाढदिवस असून, ८५ आमदार निवडून आणण्याचे ध्येय राष्ट्रवादीने ठेवले आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावेत अशी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी तिन्ही मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. शहरात मर्यादित ताकत असलेल्या काँग्रेसनेही तिन्ही मतदारसंघांवर हक्क सांगितला आहे.

हेही वाचा : भाजपा-संघामध्ये तब्बल पाच तासांची बैठक; नव्या अध्यक्षाच्या निवडीबरोबरच ‘या’ विषयावर झाली खलबतं

ठाकरे गटाने भोसरी या शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघासाठी आग्रह धरला आहे, तसेच पिंपरीत गेल्या वेळी शिवसेनेचा आमदार होता. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ मिळाले पाहिजेत, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे जागावाटपावरून महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत पिंपरी आणि भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादीकडे, तर चिंचवड काँग्रेसकडे असायचा. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आघाडीसोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चिंचवड, भोसरी भाजपला, तर पिंपरी ‘राष्ट्रवादी’ला?

ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ असे महायुतीचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महायुतीत विद्यमान आमदार असलेला चिंचवड, भोसरी भाजपला, तर पिंपरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : लोकसभेमध्ये अनुसूचित जातींमधील ‘प्रबळ’ गटांना आहे अधिक प्रतिनिधित्व? काय सांगते आकडेवारी?

शहरात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावेत अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

मयूर जयस्वाल (वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस)

तिन्ही मतदारसंघांत पक्षाचे संघटन मजबूत आहे. ताकदीचे उमेदवार आहेत. निवडून येण्याच्या निकषांवर तिन्ही मतदारसंघांची मागणी केली आहे.

तुषार कामठे (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

प्रत्येक पक्षाने आपल्या ताकदीचे आत्मपरीक्षण करावे. ज्या पक्षाची जास्त ताकत आहे. त्या पक्षाला मतदारसंघ मिळावा अशी आमची भूमिका आहे. याबाबतचा अहवाल पक्षप्रमुखांना पाठविला आहे.

सचिन भोसले (शहरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)