सांगली : सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील जागेवरून निर्माण झालेला पेच आता बंडखोरीच्या टप्प्यापर्यंत पोहचला आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेली चंद्रहार पाटील यांची उमेदवारी काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या संभाव्य बंडखोरीमुळे अडचणीत येण्याची चिन्हे दिसत असून विरोधकामध्ये पडलेली फूट कशी पथ्यावर पाडता येईल हा भाजपचा प्रयत्न असेल. सांगलीच्या जागेवर काँग्रेसचाच पारंपारिक हक्क आहे असे सांगत महाविकास आघाडीत काँग्रेसच्या नेत्यांनी आग्रह धरला, गल्लीपासून दिल्लीपर्यंत दबावाचे राजकारण करूनही पदरात काही पडेल याची आता शाश्‍वती उरलेली नसून प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाकरे शिवसेनेच्या प्रारंभीच्या भूमिकेवर केवळ नाराजी व्यक्तं करून आघाडी अंतर्गत संघर्षाला पूर्णविराम दिला. जिल्ह्यातील नेते माजी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांनी अखेरच्या टप्प्यापर्यंत सांगलीतील कलहाचे अन्य ठिकाणी पडसाद उमटणार नाहीत याची दक्षता घेत सबुरीचे धोरण स्वीकारले. सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेरविचार करण्याची कदम यांची मागणी मान्य होण्यासारखी अजिबात वाटत नाही. आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवातही झाली असल्याने तडजोडीचे मार्गही बिकट आण किचकट होत चालले असल्याने काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्तेही आता निर्णायक भूमिकेवर आले असून याचे पडसाद तालुका समितीच्या बैठकीत उमटले.

हेही वाचा : इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?

मिरज तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत समिती बरखास्त करून जिल्हा कार्यालयावरील काँग्रेसचे नाव पुसून टाकण्याचा प्रकार घडला. यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसची वाटचाल बंडखोरीच्या दिशेने सुरू आहे यावर शिक्कामोर्तब होते. एकीकडे वसंतदादा पाटील यांच्या वारसदारांची उमेदवारी नाकारून कोंडी केली जात असल्याची भावना वाढीस लागली असताना बंडखोरीसाठी ताकद संघटित होत चालली आहे. याचा निश्‍चितच परिणाम मविआच्या कामगिरीवर होत असून याचे पडसाद नजीकच्या हातकणंगले, कोल्हापूर येथील मतदार संघावर होण्याची शक्यता दिसत आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली गेली, त्या बदल्यात सांगलीच्या जागेवर ठाकरे शिवसेनेने प्रभावीपणे दावा करत पदरात पाडून घेतली. आठ दिवसापुर्वी शिवसेनेेत प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांना मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात उमेदवारी जाहीर केल्यानंतरच सुस्तावलेल्या काँग्रेसला खर्‍या अर्थाने जाग आली. यानंतरच हा तिढा अधिक जटिल बनला, मात्र शेंडी तुटो वा पारंबी तुटो या नीतीने शिवसेनेने अखेरपर्यंत पैलवानाच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली असल्याने युध्दास सज्ज असलेल्या काँग्रेसची तहात मात्र हार झाली. याचा परिणाम म्हणून दादा घराण्याबद्दल आणि विशाल पाटील यांच्याबद्दल सहानभुतीचे वातावरण मतदार संघात निर्माण झाले असून यामध्ये ठाकरे शिवसेनेबरोबरच भाजपलाही झळ बसण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

विशाल पाटील यांनी बंडखोरीचे निशाण खांद्यावर घेतले असले तरी मतदार जुळणी कशी केली जाते यावरच पुढचे मतांचे गणित अवलंबून आहे. मतदार संघात एकास एक लढत झाली तरच भाजपवर मात होउ शकते हा गतवेळच्या निवडणुकीचा अनुभव विचारात घेतला तर फार मोठा संघर्ष होउ घातला आहे हे लक्षात येते. बंडखोरीसाठी लागणारी कुमक कोठून आणणार हा प्रश्‍न आहेच. कारण पक्षाची ताकद मिळणार नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रचारासाठी उपलब्ध होणार तर नाहीच, पण याचबरोबर पक्षाकडून कारवाई सुध्दा अपेक्षित ठेवावी लागणार आहे. या कारवाईला सामोेरे जाण्याची तयारी दर्शवली गेली तर चार-सहा महिन्यात होणार्‍या विधानसभेवेळी गोची होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करूनच बंडखोरीमागे ताकद उभी केली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आघाडी धर्माचे पालन करून ठाकरे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात उतरेलही, मात्र, ही ताकद वगळून बंडखोर गटाला मतांचा हिशोब करावा लागणार आहे. भाजपमध्येही नाराजी आहे, त्या नाराजीच्या भांडवलावर जर बंडखोरीचा विचार असेल तर तितका पुरेसा ठरणार नाही. या पलिकडे जाउन मतदारांना बंडखोरी का केली याचे उत्तर द्यावे लागणार आहे. केवळ खासदारकी, सत्ता मिळविण्यासाठीच हे बंड असे न होता, जिल्ह्याच्या विकासाचा दृष्टीकोन काय आहे हे सांगावे लागणार आहे. कारण दिशा स्पष्ट असेल तरच मतदारांचा विश्‍वास मिळवता येईल, अन्यथा पुन्हा एकदा मागचे पाढे पंचावन्न अशीच गत होण्याचा धोका अटळ आहे.