सोलापुरात कोठे, माने, चंदनशिवे राष्ट्रवादीच्या वाटेवरच, पण…

कोठे, माने, चंदनशिवे यांंचा पक्षप्रवेश नेमका केव्हा होणार, हे कोणालाही सांगता येत नाही. शहरात सध्या तरी पक्षात मरगळ दिसून येते.

सोलापुरात कोठे, माने, चंदनशिवे राष्ट्रवादीच्या वाटेवरच, पण…
दक्षिण सोलापुरात आमदारकीसाठी दिलीप मानेंची भूमिका 'एकला चलो रे..'

एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : काँग्रेस व एमआयएम असा राजकीय प्रवास करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उंबरठ्यावर उभे राहिलेले बाहुबली नेते तौफिक शेख हे एमआयएमच्या सहा माजी नगरसेवकांसह शुक्रवारी राष्ट्रवादीत अधिकृतपणे दाखल झाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात या पक्षप्रवेशाची औपचारिकता पार पडली. शेख यांच्याशिवाय शिवसेनेचे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे, माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने आणि वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते आनंद चंदनशिवे यांच्याही अधिकृत राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल उत्सुकता कायम आहे.

राज्यात राजकीय महानाट्य घडल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी प्रवेशासाठी इच्छुकांची गर्दी आता ओसरली आहे. कोठे, माने, चंदनशिवे या तिघांचीही राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यावरून चलबिचल असल्याचे दिसून येते. दुसरीकडे एमआयएम पक्ष नव्याने सावरण्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते फारूख शाब्दी यांची ताकद पणाला लागणार आहे.

हेही वाचा.. संजय राठोडांना शह देण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा पोहरादेवी दौरा

राज्यात सत्तांतराचे नाट्य घडण्यापूर्वी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वरचेवर वाढत होता. सोलापूर शहरात एमआयएम, काँग्रेस, शिवसेनेसह अन्य पक्षांमध्ये गळती होऊन अनेक स्थानिक नेते राष्ट्रवादीत दाखल झाले होते. तर काही वजनदार नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर होते. शिवसेना सोडलेले माजी महापौर महेश कोठे यांनी तर राष्ट्रवादीत अधिकृतपणे प्रवेश न करताच पक्षाची सूत्रे हाती घेतली होती. शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने यांनीही राष्ट्रवादीशी संपर्क वाढविला होता. तर वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक नेते आनंद चंदनशिवे यांनी सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यामार्फत राष्ट्रवादी प्रवेशाचा घाट घातला होता. तथापि, गेल्या जूनअखेर राज्यात उध्दव ठाकरे यांचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. परिणामी, राष्ट्रवादीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नेत्यांचा हिरमोड झाला. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात आल्यानंतर महेश कोठे यांनी पूर्वीच्या संबंधाचे कारण पुढे करीत त्यांची भेट घेतली. त्यानंतर कोठे हे आताही शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी तसेच राष्ट्रवादीची सूत्रे त्यांच्या हाती देण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Maharashtra News Live: पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, जाणून घ्या महाराष्ट्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर

दरम्यान, एमआयएममधून फुटून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासमोर सद्यस्थितीत राष्ट्रवादीशिवाय दुसरा राजकीय पर्यात राहिला नव्हता. त्यामुळे ते राष्ट्रवादीवासी झाले आहेत.वास्तविक पाहता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा विश्वास संपादन करून सोलापूर महापालिका अनेक वर्षे स्वतःच्या वर्चस्वाखाली ठेवलेले महेश कोठे हे स्वतःचे आमदारकीचे घोडे गंगेत न्हाऊ घालण्यासाठी २०१४ साली काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत गेले होते. २०१४ साली सोलापूर शहर मध्य विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढविली होती. त्याचवेळी त्यांचे वडील विष्णुपंत कोठे यांच्या आशीर्वादाने राजकारणात आलेले बाहुबली नेते तौफिक शेख यांनीही काँग्रेसमधून एमआयएममध्ये प्रवेश करीत कोठे यांच्या बरोबरीने शहर मध्य विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना पराभूत करणे हाच कोठे आणि शेख यांचा प्रमुख हेतू होता. त्यात कोठे यांनी शेख यांची उमेदवारी आपल्या पथ्यावर पडण्यासाठी धार्मिक ध्रुवीकरणाचा खेळ मांडला होता. परंतु झाले उलटेच. प्रणिती शिंदे (४६ हजार ९७ मते) विजयी झाल्या. तर महेश कोठे यांचे आमदारकीचे स्वप्न भंगले. ते तिसऱ्या स्थानी (३३ हजार ३३४ मते) फेकले गेले होते. तर एमआयएमचे म्हणून तौफिक शेख यांना दुसऱ्या क्रमांकाची ३७ हजार १३८ मते पडली होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी कोठे आणि शेख यांचे आव्हान यशस्वीपणे परतवून लावले तरी पुढे २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत कोठे आणि शेख यांचे उपद्रवमूल्य आमदार प्रणिती शिंदे यांना त्रासदायक ठरले होते. महेश कोठे यांनी शिवसेनेत स्वतःचा दबदबा कायम ठेवण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा विश्वास संपादन करून शिवसेनेचे २१ नगरसेवक निवडून आणले होते, तर दुसरीकडे तौफिक शेख यांनीही ताकद पणाला लावून एमआयएमचे ९ नगरसेवक निवडून आणले होते. त्यात काँग्रेसची अवस्था केविलवाणी होऊन पक्षाला केवळ १४ नगरसेवक निवडून आणणे शक्य झाले होते. परिणामी, महापालिकेतील काँग्रेसकडे असलेली सत्ता भाजपने एकहाती मिळविली होती. पुढील काळात कोठे आणि शेख यांच्यासमोर नव्याने संकटे आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तौफिक शेख हे शेजारच्या कर्नाटकातील विजापूरच्या परिचित महिलेच्या खूनप्रकरणी अडकले तर दुसरीकडे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसमधून शिवसेनेत आले आणि तत्कालीन नेते तानाजी सावंत यांच्या मदतीने शहर मध्य विधानसभा निवडणुकीत स्वतःची उमेदवारी निश्चित करून आणली. महेश कोठे यांचा अपेक्षाभंग झाला. तेव्हा त्यांना सेनेच्या विरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवावी लागली होती. तर तिकडे तौफिक शेख हे कर्नाटकात खून प्रकरणात अटकेत राहिल्याने एमआयएमने त्यांचे विधानसभेचे तिकीट कापून फारूख शाब्दी यांना समोर आणले होते. अखेर महेश कोठे व दिलीप माने यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाची मते कायम राखली होती.

या पार्श्वभूमीवर पुढे २०१९ साली राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीची ताकद वाढू लागली, तसे सोलापुरात कोठे, शेख आदी मंडळींना राजकीय भूमिका बदलावी लागली. हे दोघेही राष्ट्रवादीच्या संपर्कात आले. कोठे यांनी तर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्तेचा सोपान गाठून देण्याचा भरवसा दिला होता. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही महेश कोठे यांचे राजकीय मूल्य ज्ञात होते. त्यामुळे त्यांनी महापालिका निवडणूक जिंकण्याच्या हेतूने महेश कोठे यांच्याकडे शहरातील पक्षाची सूत्रे सोपविली होती. एव्हाना, कोठे यांचा राष्ट्रवादीत अधिकृतपणे प्रवेश झाला नसला तरी स्थानिक पातळीवर पक्ष त्यांच्याच ताब्यात गेला होता. तौफिक शेख हेही सत्ता संरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या वाटेवर राहिले. दुसरीकडे बसपा व वंचित बहुजन आघाडीत फिरल्यानंतर आनंद चंदनशिवे यांचे तत्कालीन पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याशी सूत जुळले आणि तेदेखील राष्ट्रवादीत येण्याची स्वतंत्र खटपट करू लागले. त्यामुळे राष्ट्रवादीचा दबदबा वाढत असतानाच अचानकपणे राज्यात मोठे राजकीय नाट्य घडले आणि इकडे सोलापुरात राष्ट्रवादी प्रवेशाची चाके रुतून बसली. महेश कोठे यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा पर्याय आहे. दिलीम माने व चंदनशिवे यांनाही दुसरे पर्याय आहेत. परंतु तौफिक शेख हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात किंवा थेट भाजपमध्ये जाऊ शकत नाहीत. पूर्वीच्या काँग्रेस किंवा एमआयएममध्ये परत फिरण्याचा त्यांचा मार्ग तर केव्हाच बंद झाला आहे. त्यामुळे शेख यांच्यासाठी एकमेव राष्ट्रवादीचाच पर्याय राहिला आहे. अखेर उशिरा का होईना, त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा पर्याय कृतीत आणला. तोपर्यंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही सोलापुरातील कोठे, माने, शेख व चंदनशिवे यांच्या विषयी खात्री उरली नव्हती. त्यांनी पुरेशी खात्री करूनच सोलापूरचा दौरा आखला आणि तौफिक शेख यांच्या हातावर ते घड्याळ बांधू शकले. आता महेश कोठे, माने, चंदनशिवे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल चलबिचलता असल्याचे बोलले जाते. पक्ष प्रवेश टाळून कोठे व माने यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्नेहभोजनात सामील झाले. मात्र तरीही त्यांचा पक्षप्रवेश नेमका केव्हा होणार, हे कोणालाही सांगता येत नाही. शहरात सध्या तरी पक्षात मरगळ दिसून येते.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
संजय राठोडांना शह देण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा पोहरादेवी दौरा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी