कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेत महाविकास आघाडीने समाधानकारक जागा न दिल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा देत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी खळबळ उडवली असताना कोल्हापुरात मात्र ठाकरे सेनेला काँग्रेसच्या कृपादृष्टीवर अवलंबून राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. माजी खासदार विनायक राऊत यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी काँग्रेसने शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद देऊन मदत करावी, असे आवाहन केले आहे. त्याला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडून कितपत, कसा प्रतिसाद मिळणार यावर ठाकरे सेनेचे भगवा फडकवण्याचे स्वप्न अवलंबून असणार आहे. ठाकरे सेनेतील स्थानिक नेत्यातील अंतर्गत मतभेद हा मोठा अडसर ठरण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी कसून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. इचलकरंजी महापालिका कार्यक्षेत्रात ठाकरे सेनेची ताकद राजकीय ताकद अगदीच क्षीण झालेली आहे. तरीही जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी महाविकास आघाडी कडून सन्मानजनक जागा मिळणार नसतील तर स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. मुळात येथे शिवसेनेकडे उमेदवार आहेतच किती हा गंभीर प्रश्न आहे. शिवाय, इचलकरंजीची राजकीय नस ओळखणारे नेतृत्व ठाकरे सेनेकडे नाही. पूर्व भागाकडील दुसरे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांचे कार्यालय आणि कार्यक्षेत्र इचलकरंजी शहर आणि हातकणंगले तालुका असताना त्यांच्याकडे पन्हाळा, शाहूवाडी तालुक्याची जबाबदारी सोपवण्याचा अव्यवहार्य निर्णय ठाकरे सेनेच्या नेत्यांनी घेऊन नेमके काय साध्य आहे असा प्रश्न शिवसैनिकांनाच पडलेला आहे.
ठाकरेसेना मतभेदाने जर्जर
कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत ठाकरेसेनेकडून घेतले जाणारे निर्णय नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. अगदी गेल्या २५ वर्षात संयुक्त सेनेत आमदार राजेश क्षीरसागर व उपनेते संजय पवार यांच्यात कायमच छत्तीसचा आकडा राहिला होता. राजेश क्षीरसागर यांनी डागाळलेली प्रतिमा असतानाही रवीकरण इंगवले यांना सोबत घेण्याचा निर्णय धाडसी ठरला होता. परंतु दोघांमध्ये वितुष्ट आल्यानंतर इंगवले यांनी वारंवार क्षीरसागर यांना डिवचले. पुढे एका प्रकरणात जाहीरपणे महिलांबाबत अश्लील हावभाव केल्याने रविकिरण इंगवले यांच्यासह ४० कार्यकर्त्यांवर महिलांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला होता. त्यावर क्षीरसागर यांनी मी तेथे असतो तर ठोकून काढले असते, असा खरमरीत इशारा दिला होता. त्यानंतर इंगवले यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्ष सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यावर नाराज होत संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. तर, शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी ठाकरे सेनेला रामराम ठोकला. आताही पवार आणि इंगवले यांच्यात बेबनाव असताना महापालिका निवडणूक जिंकण्याचे आव्हान ठाकरे सेनेसमोर आहे.
काँग्रेसकडे मदतीचे आवाहन
कोल्हापुर शहरात ठाकरे सेनेकडे सक्षम उमेदवार हाताच्या बोटावर मोजता मोजता येईल इतकेच दिसतात. त्यातही निवडून येण्याची क्षमता असणारे तर किती हे शोधावे लागतील अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची भाषा केली जात असली तरी ती वास्तवापासून दूर आहे. कदाचित, याच एकूण परिस्थितीची जाणीव झाल्याने माजी खासदार विनायक राऊत, आमदार सुनील प्रभू यांनी कोल्हापूर दौऱ्यात नरमाईचा सूर लावला. काँग्रेसने अधिक मदत करावी अशी भावना कार्यकर्त्यांनी मांडल्याचे सांगत राऊत यांनी काँग्रेसकडूनही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
आव्हानांचा डोंगर
त्याला काँग्रेसचे विधान परिषदेचे गट नेते सतेज पाटील यांच्याकडून कितपत प्रतिसाद मिळणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोल्हापुरातील प्रत्येक प्रभागात कोणत्या पक्षाची, कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे याची साद्यंत माहिती सतेज पाटील यांच्याकडे असल्यामुळे ते ठाकरे सेनेला फारसे जागा देतील अशी शक्यता दिसत नाही. महाविकास आघाडीचा धर्म म्हणून काही जागा ते देण्याची शक्यता आहे. सतेज पाटील यांच्या कृपादृष्टीवर ठाकरे सेनेला करवीरनगरीत अवलंबून राहावे लागेल असे सध्याचे तरी चित्र आहे. तथापि, महापालिका निवडणुकीला सामोरे जाताना ठाकरे गटासमोर पवार – इंगवले यांच्यातील अंतर्गत कलह, इंगवले यांच्या कलंकीत प्रतिमेवर शिवसैनिकांकडून लावले जाणारे प्रश्नचिन्ह, शिवसेनेचे विस्कळीत झालेले संघटन अशा आव्हानांचा डोंगर उभा आहे. यामुळेच फुटी नंतर ताकद गमावलेल्या ठाकरे पक्षाचे महापालिकेवर भगवा फडकणे हे दिवास्वप्न राहणार नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
