संतोष प्रधान
राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचे नाव निश्चित करण्याकरिता काँग्रेस नेतृत्व आठवडाभर विचारमंथनच करीत असतानाच शेजारील कर्नाटकमध्ये दोन महिन्यांनंतरही भाजपला विरोधी पक्षनेता निवडण्यात अपयश आले आहे. या पदावरून दोन्ही पक्ष परस्परांवर टीका करीत असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे हे अपयश मानावे लागेल.

अजित पवार यांच्या बंडानंतर राज्य विधानसभेत ४५ आमदार असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले होते. पण पहिला आठवड्याचे कामकाज संपले तरी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे पत्र विधानसभा अधक्षांकडे सादर करता आलेले नाही.

आणखी वाचा-केंद्राचा निधी हडपणारे राजकीय नेते की अन्य कोण?

पक्षांतर्गत गटबाजीमुळे काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांना विरोधी पक्षनेतेपदाची निवड करणे अवघड जात असावे. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजय वडेट्टीवार की नव्या चेहऱ्यांपैकी कोणाला संधी द्यायची यावर पक्षात खल सुरू आहे. अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेतेपदात फारसा रस दाखविलेला नाही.

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदावर नाव निश्चित करण्यासाठी होणाऱ्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली. पण बावनकुळे यांच्या भाजपला शेजारील कर्नाटकमध्ये दोन महिने झाले तरी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण असावा याचा निर्णय करता आलेला नाही. परिणामी सध्या सुरू असलेले विधानसभेचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडत आहे. विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित करण्याकरिता दोन आठवड्यांपूर्वी मनखुस मांडविय आणि विनोद तावडे या दोघांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या दोन्ही नेत्यांनी बंगळुरूमध्ये जाऊन आमदारांच्या मताची दखल घेतली. दोघांनी आपला अहवाल पक्षाला सादर केला. तरीही अजून विरोधी पक्षनेत्याचे नाव पक्ष निश्चित करू शकलेला नाही. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विरोधी पक्षनेते करण्यास पक्षातील आमदारांचा विरोध आहे. राज्यात मराठा व ओबीसी असे जातीचे समीकरण साधावे लागते. त्याप्रमाणे कर्नाटकात लिंगायत व वोकलिंग अथवा अन्य जातीचे समीकरण साधावे लागते.

आणखी वाचा- महाराष्ट्राच्या इतिहासात विधान परिषदेत महिला उपसभापती किती?

कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाने भाजपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनाही विरोधी पक्षनेतेपद भाजपने त्यांच्यासाठी सोडावे, अशी इच्छा असल्याचे बोलले जाते. कर्नाटकातील सत्ता गमाविल्यापासून भाजपमध्ये आलेली मरगळ अद्यापही दूर झालेली नाही.