राज्यात २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये भाजपने आघाडी घेतली होती. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिला क्रमांक पटकविला होता. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिला क्रमांक कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असेल.
एकनाथ शिंदे यांच्या २०२२ मधील बंडानंतर राज्याच्या राजकारणाची सारी समीकरणेच बदलली. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी हे चार मुख्य पक्ष आधी होते. जून २०२२ मधील शिवसेनेतील फुटीनंतर राजकारणाचा सारा पोतच बदलला. शिवसेना ठाकरे आणि शिंदे तसेच जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार असे दोन नवीन पक्ष उदयाला आले. २०२१-२२ मध्ये काही जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडलेल्या नाहीत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीनंतर महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पहिल्यांदाच पार पडत आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा कोणत्या पक्षाची किती ताकद याचा अंदाज आला होता. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने राज्यातील ४८ पैकी ३० जागा जिंकून भाजपला मोठा धक्का दिला होता. २०१४ पासून कायम सर्व निवडणुकांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपची चांगलीच पिछेहाट झाली होती. काँग्रेसने राज्यात सर्वाधिक १३ जागा जिंकल्या होत्या. भाजपला नऊ जागांवरच समाधान मानावे लागले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र चमत्कार झाला. महायुतीने विक्रमी २३२ जागा जिकंल्या. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभराने पहिल्यांदा राजकीय पक्षांना आपल्या ताकदीचा अंदाज येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यावर होणाऱ्या या निवडणुकीत मुंबईसह राज्याच्या अन्य भागांमध्ये ठाकरे बंधूंचा कितपत प्रभाव पडतो याची कसोटी आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती फटका बसतो याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राष्ट्रवादीच्या पवार काका- पुतण्यात कोण बाजी मारतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे जास्त खासदार निवडून आले होते. अजित पवारांच्या पक्षाचा एकच खासदार निवडून आला होता. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले तर शरद पवार गटाचा पार धुव्वा उडाला होता.
महाविकास आघाडी आणि महायुतीत सर्वच पालिकांमध्ये आघाडी वा युती होणे शक्य नाही. युती वा आघाड्या उभयांतानाही सोयीच्या नाहीत. भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. कारण २०१४ पासून लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता पहिला क्रमांक राखणाऱ्या भाजपला या निवडणुकीतही आघाडी कायम टिकवावी लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
२०१४ ते २०१८ या काळात झालेल्या नगरपालिका निवडणुकीतील पक्षीय संख्याबळ
एकूण जागा : ७४९३
भाजप : १९४४
काँग्रेस : १५७७
राष्ट्रवादी : १२९४
शिवसेना : १०३५
अपक्ष : ८५२
छोटे पक्ष, स्थानिक आघाड्या : ५८१
(संदर्भ : राज्य निवडणूक आयोग आकडेवारी)
