यवतमाळ – जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारांची समजूत काढण्यासाठी स्थानिक व राज्य पातळीवरील नेते प्रयत्न करीत आहे. मात्र पुसद वगळता अन्य ठिकाणी बंडखोरांची नाराजी अद्याप दूर झालेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात वणी, उमरखेड, पुसद व यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. यात सर्वाधिक चर्चा झाली ती पुसद येथील नाईक कुटुंबातील बंडखोरीची. पुसद येथे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी त्यांचे मोठे बंधू ययाती नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारी नाकारली. त्यामुळे ययाती नाईक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून लहान भावासमोर आव्हान निर्माण केले. पुसदसह त्यांनी सर्वाधिक बंजारा मते असलेल्या कारंजा (जि. वाशिम) मतदारसंघातही अर्ज दाखल केला.

या प्रकाराने नाईक कुटुंबातील वाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला. ययाती यांच्या या खेळीने महायुतीत चिंता व्यक्त होवू लागली. ययाती नाईक यांची समजूत घाल्यण्याची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांचे सुपूत्र अविनाश नाईक यांच्यावर सोपविण्यात आली. अविनाश नाईक यांच्या शिष्टाईला यश आल्याचे समजते. त्यांनी ययाती नाईक यांची समजूत घातल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे उद्या अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ययाती नाईक पुसद विधानसभा मतदारसंघातील नामांकन अर्ज मागे घेतील, असे महायुतीत ठामपणे सांगितले जात आहे. मात्र कारंजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ययाती नाईक ठाम असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात ययाती नाईक यांना ‘आपण माघार घेणार का?’, असे विचारले असता केवळ ‘हो’ असे उत्तर देत बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सिंदखेडराजात ‘मित्रांची’ लढत अटळ

ययाती नाईक यांनी माघार घेतल्यास येथे महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल. पुसदमध्ये बंजारा, आदिवासी, मराठा, कुणबी, अल्पसंख्याक ही मते अधिक आहेत. महाविकास आघाडीने येथे मराठा कार्ड चालविले. त्यामुळे बंजारा विरूद्ध मराठा, कुणबी अशी जातीय समिकरणावर येथील निवडणूक जाण्याची शक्यता आहे. येथे मनसे, वंचित, बसपाचे उमेदवारही निवडणूक लढवित आहेत. मात्र यातील कोणीही उमेदवार प्रभावी नसल्याने यावेळी मराठा, कुणबी समाजाच्या मतांसोबतच मुस्लीम, दलित, ओबीसी मते मिळण्याची आशा महाविकास आघाडीला आहे. असे झाल्यास पुसदमध्ये ययाती नाईक यांनी रिंगणातून माघार घेवूनही महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

हेही वाचा >>> बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा

पुसदमध्ये बंडखोराची समजूत घालण्यात महायुतील यश आले. मात्र उमरखेड, वणी, यवतमाळमधील गुंता सोडविण्यात महाविकास आघाडीला अद्याप यश आले नाही. महाविकास आघाडीत वणी, उमरखेड, यवतमाळमध्ये बंडखोरी करणारे उमेदवार उद्या अर्ज मागे घेतील, अशी सकारात्मक चर्चा सर्वांशी झाली आहे, असे महाविकास आघाडीचे समन्वयक खासदार संजय देशमुख यांनी सांगितले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 maha vikas aghadi expects to withdraw nomination by rebels in yavatmal district print politics news zws