वाल्मिक कराडच्या अटकेनंतर परळी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुंडे बंधू – भगिनीसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबियाच्या वर्चस्वाखालील राखेतील परळीमध्ये जरांगे समर्थक कोणता नवा डाव मांडतात, याची उत्सुकता मराठवाड्यात सर्वाधिक आहे. धनंजय मुंडे यांनी हत्येचा कट रचल्याचा आरोप करुन जरांगे यांनी खळबळ उडवून दिली होती. एकमेकांना राजकीय पातळीवर संपविण्याची भाषा मागे पडल्यानंतर मांडल्या जाणाऱ्या परळीच्या पटावर मुंडे बंधू – भगिनीची दमछाक होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परळी नगरपालिकेवर वाल्मिक कराडचे वर्चस्व होते. ते म्हणतील तो शब्द अंतिम होत असे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास फक्त सही करणे, एवढेच काम असे. निर्णय प्रक्रिया पूर्णत: वाल्मिक कराड याच्या ताब्यात होती. शहरातील रस्त्यांपासून ते परळी औष्णिक वीज केंद्रातून ( सध्या बंद असणाऱ्या ) निघणारी राख उकरणे अजूनही चालूच आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण हा विषय परळीकरांसाठी गंभीर असला तरी तो या निवडणुकीत चर्चेत येण्याची शक्यता नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परळीची कमालीची बदनामी झाली. त्यानंतर शहरातील काही प्रश्नी पंकजा मुंडे यांनी भूमिका घेऊन काही कामे प्रशासनाला नव्याने करायला लावली. मात्र, या निवडणुकीमध्ये परळीमध्ये मराठा – ओबीसी हा वाद हाच चर्चेचा विषय असेल. प्रत्यक्ष मतदानात त्याचा प्रभाव फारसा राहणार नाही, असाही दावा केला जात आहे.

मुंडे बंधू – भगिनी यांच्या राजकीय सत्तेला आव्हान देणारा व्यक्ती कोण असेल आणि त्याला जरांगे यांचा पाठिंबा मिळेल का, असे प्रश्न विचारले जात आहेत. येत्या दोन दिवसात जागावाटपाचे सूत्र ठरू ठरू शकते. अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा द्यायच्या किंवा भाजपने किती जागा लढवाच्या याचा निर्णय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना करावा लागणार आहे. १७ नोव्हेंबरपर्यंत हे निर्णय घेतले जातील असे, असे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे. केवळ परळी नाही तर बीड, गेवराई, धारुर या नगरपरिषदेमध्ये अजित पवार गटाचा जागावाटपात हिस्सा किती, हे अजून गुलदस्त्यात आहे. या नगर परिषदेमध्ये कोणते उमेदवार उभे करायचे याची पंकजा मुंडे यांनी चाचपणी पूर्ण केली आहे. काही ठिकाणच्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन झाल्या आहेत. परळीतून वाल्मिक कराड यांच्यानंतर कोण, असा उत्सुकतेचा प्रश्न राज्यातील राजकीय पटावर चर्चेत आला आहे.

परळी नगराध्यक्ष पद हे महिलेसाठी राखीव असल्याने अनेक नेते त्यांच्या पत्नीला पुढे करण्याची तयारी करू लागले आहेत. परळी नगर परिषदेच्या हद्दीत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने आम्हाला प्रतिनिधीत्व असा आग्रह धनंजय मुंडे यांच्याकडे होऊ शकतो. तो भाजप नेत्यांना मान्य होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.