अविनाश कवठेकर
मशिदींवरील भोंग्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर पक्ष स्थापनेपासून राज यांच्यासोबत असलेले त्यांचे खंदे कार्यकर्ते वसंत मोरे नाराज झाले. राज यांच्या आदेशाचे पालन करणे शक्य होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आणि शहर मनसे विरुद्ध वसंत मोरे असा संघर्ष सुरू झाला. मोरे यांची नाराजी अद्यापही कायम असून या संघर्षामुळे राज ठाकरे आपला एक खंदा समर्थक आणि मनसे पुण्यातील एक खंदा नेता गमविणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
कात्रज परिसरातून वसंत मोरे गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येत आहेत. प्रभागातील उत्तमकामगिरीमुळे या परिसरातील मुस्लिम समाज वसंत मोरे यांच्या पाठीशी राहिला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांचा मुद्दा हाती घेतल्यानंतर मात्र वसंत मोरे यांची राजकीय अडचण झाली. मशिदींवरील भोंग्यांबाबत राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले जाणार नाही, अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे पक्षात एकाकी पडले.
पक्षाने त्यांच्याकडील शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेत मोरे यांचे घनिष्ट मित्र, माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवली. त्यामुळे वसंत मोरे नाराज असून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र राज ठाकरे यांना भेटल्यानंतर आपण राजमार्गावरच आहोत, पक्ष सोडणार नाही, असे वसंत मोरे यांनी जाहीर केले. ते पक्षाच्या काही कार्यक्रमात दिसत असले तरी अद्यापही त्यांची नाराजी दूर झालेली नाही. कोंढवा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या प्राथमिक मुलाखतीला वसंत मोरे उपस्थित होते. त्यामुळे एकाकी पडलेले मोरे पक्षात सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली असताना सुकाणू समितीच्या बैठकीतील त्यांची अनुपस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे ते पक्ष सोडणार, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून मोरे आणि वरिष्ठ शहर पदाधिकारी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. औरंगाबाद येथील जाहीर सभेवेळी राज पुण्यातून औरंगाबादला रवाना झाले त्यावेळी, आणि राज यांच्या अयोध्या दौरा नियोजनात मोरे यांचा सहभाग कुठेच नव्हता. एकीकडे वसंत मोरे पक्षात सक्रीयअसल्याचा दावा पक्षाचे नेते करत आहेत, तर दुसरीकडे पक्षापुढे, राज ठाकरे यांच्या आदेशापुढे कोणी मोठा नाही, अशी उघड भूमिका मनसे शहर पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मनसेत असले तरी पक्षाच्या कार्यक्रमांपासून मोरे दूर आहेत, ही वस्तुस्थिती लपून राहिलेली आहे. कार्यक्रमांना, बैठकांना आले तर ठीक, ते नाही आले तरी ठीक अशीच मनसे शहर पदाधिकाऱ्यांची भूमिकाआहे.
गेल्या महिन्यातील पुणे दौऱ्यात राज ठाकरे स्वत: वसंत मोरे यांच्याबरोबर चर्चा करणार होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांचा दौरा अर्ध्यातच संपला व ते मुंबईला परतले. त्यामुळे ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे मोरे यांची नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. नाराज मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने दिला होता. खासगी समारंभात वसंत मोरे आणि शिवेसना खासदार संजय राऊत यांची भेट झाल्यानंतर मोरे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची चर्चा सुरू झाली.
माझ्याकडे भरपूर पर्याय आहेत, मात्र ‘सध्या मी मनसेतच आहे आणि राजमार्गावर आहे’, असे वसंत मोरे सांगत आहेत. या परिस्थितीत मोरे यांची नाराजी दूर झाली नाही तर, मनसे एका खंद्या नेत्याला गमवणार अशी चर्चा होणे स्वाभाविक आहे.