राजस्थानमधील चुरू येथील भाजपा खासदार राहुल कासवान यांनी पक्ष सोडण्याचे कारण सांगितले आहे. १९९९ पासून त्यांच्या कुटुंबाचा चुरूमध्ये दबदबा होता, परंतु भाजपाने त्यांना तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले विद्यमान खासदार राहुल कासवान यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता ते काँग्रेसचे उमेदवार म्हणून या जागेवर निवडणूक लढवत आहेत. १९ एप्रिल रोजी मतदान होत असलेल्या मतदारसंघात त्यांची लढत भाजपाच्या देवेंद्र झझाडिया यांच्याशी होणार आहे. कासवान यांना २०१४ आणि २०१९ मध्ये या जागेवरून विजय मिळाला होता, तर त्यांचे वडील रामसिंग कासवान हे १९९९ ते २०१४ दरम्यान चुरूचे खासदार होते. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कासवान यांनी अनेक मुद्द्यांवर दिलखुलास उत्तरे दिली आहेत. भाजपा आणि एकंदरीतच माजी आमदार राजेंद्र राठोड यांच्याशी असलेल्या वितुष्टाबद्दलही त्यांनी सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही दोनदा खासदार असतानाही भाजपाने तुम्हाला तिकीट का नाकारले?

भाजपाच्या राजेंद्र राठोड यांनी माझ्या करिअरला नेहमीच खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला. २०१९ च्या निवडणुकीच्या धावपळीतही त्यांनी मला पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. त्यांनी आता आपली सर्व शक्ती वापरली. त्यामुळेच मला तिकीट नाकारण्यात आले. एका व्यक्तीच्या हातात सत्ता गेल्याची तक्रार मी (भाजपा) प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे केली होती, पण माझी तक्रार ऐकून घेण्यात आली नाही.

निवडणुकीचा निकाल तुमच्या बाजूने लागेल असे तुम्हाला वाटते का?

लोकांशी असलेले माझे नाते माझ्यासाठी काम करीत आहे. कोणत्याही नेत्याने आपल्या मतदारसंघात कठोर परिश्रम घेण्याबरोबरच जनतेला नियमितपणे भेटल्यास आणि तळागाळात चांगले संबंध असल्यास मत गमावणार नाही.

हेही वाचाः माढ्यात मोहिते- पाटलांच्या प्रवेशाने राजकीय गणिते बदलली

तुमच्या कुटुंबाचा भाजपाशी दीर्घकाळ संबंध आहे आणि इथल्या मतदारांनी त्यांना पसंती दिली. आता तुम्ही काँग्रेसचे उमेदवार असल्याने मतदारांची पसंती बदलेल असे तुम्हाला वाटते का?

ते आधीपासूनच माझ्याबरोबर आहेत. ही निवडणूक जिंकण्याची किंवा हरण्याची नसून पक्ष (भाजपा) नेतृत्व उमेदवार जनतेवर लादू शकत नाही. त्यांनी (झझाडिया) कधी स्थानिक निवडणूकही लढवली नाही आणि त्यांना तिकीट देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी आपल्याला रिंगणात उतरवण्याचे संकेत दिले होते. या दोन वर्षांत त्यांनी कधी जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला का? कोणत्याही ग्राउंड वर्कशिवाय आपण खासदार होऊ शकतो, असे त्यांना वाटते. लोकशाहीत असे चालत नाही.

चुरू निवडणूक ही कासवान विरुद्ध झझाडिया लढत नसून जाट विरुद्ध राजपूत अशी आहे का?

मी जात किंवा धर्म मानत नाही. मी कधीही कोणाशी भेदभाव केला नाही. २०१९ मध्ये मी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ३ लाखांहून अधिक मते मिळवली होती. याआधी मी अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवली होती, पण कधीही अपमानास्पद बोललो नाही. चुरूचे बरेच मतदार परदेशात काम करतात आणि काही वेळा तिथे अडकतात. त्यांना सुरक्षित इथे परत आणण्यासाठी मी अनेकदा परराष्ट्र मंत्रालयाशी बोललो आहे. त्यामुळे मतदार माझी जात नव्हे तर आदर बघतील.

हेही वाचाः जालन्यात पुन्हा दानवे विरुद्ध काळे सामना रंगणार

चुरूसाठी भाजपाचा नारा दिल्लीमध्ये नरेंद्र, चुरूमध्ये देवेंद्र असा आहे, तुम्हाला काय वाटतं?

संपूर्ण घोषवाक्यात ‘दिल्ली में नरेंद्र, चुरू में देवेंद्र और बीच में राजेंद्र (दिल्लीमध्ये नरेंद्र, चुरूमध्ये देवेंद्र पण मध्यभागी राजेंद्र)’ असे असायला पाहिजे. राजेंद्र येथे एकमेव निर्णय घेणारे नेते झाले आहेत. ते सरपंच आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही धमकावतात. त्यांचे अनेक निष्ठावंत पदाधिकारीही जातीयवादी विधाने करीत आहेत.

जाटांमध्ये भाजपाविरोधात नाराजी आहे, असे वाटते का?

शेतकरी भाजपावर खूश नाहीत. इतर समाजातही नाराजी आहे. प्रत्येक पक्षाचे निष्ठावंत असतात आणि पक्ष नेतृत्व त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. एका पराभवामुळे (२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत) राठोड हे सरकारी अधिकारी आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधात गेले आहेत. मी आणि माझे कुटुंबीयही अनेक निवडणुका हरलो, पण कोणाशीही गैरवर्तन केले नाही.

तुमच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमधील जाट नेते खूश आहेत, असे तुम्हाला वाटते का?

३५ वर्षांनंतर चुरूमधून मला खासदारकी मिळणार असल्याने काँग्रेस नेते खूश आहेत, ही जागा जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विकास हा एक प्रवास आहे. काँग्रेसने आपल्या काळात मोठी कामे केली आहेत. भाजपानेही विशेषत: (माजी पंतप्रधान) अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात चांगले काम केले. मी कोणत्याही (मोदी सरकारच्या) योजनांच्या विरोधात नाही, पण ज्या पद्धतीने गोष्टी हाताळल्या जात आहेत, त्याला माझा विरोध आहे. पक्षाला (भाजपला) मजबूत नेते नको आहेत.

…म्हणून तुम्ही भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला दोष देत आहात का?

नाही, मी भाजपाची यंत्रणा आणि तिच्या कार्यपद्धतीबद्दल बोलत आहे. मी निवडणूक लढवली नाही तर राठोड यांच्यासारखे लोक प्रदेशावर राज्य करतील आणि लोकांशी गैरवर्तन करत राहतील.

मुस्लिमांनी परंपरागतपणे काँग्रेसला मतदान केले. तुमची पूर्वीची भाजपाची पार्श्वभूमी पाहता त्याचा परिणाम होईल का?

मला असा कोणताही अभिप्राय मिळालेला नाही. लोक माझे खुलेआम स्वागत करीत आहेत. मी भाजपाबरोबर असतानाही मुस्लिमांनी नेहमीच माझे स्वागत केले आहे. मुस्लिम मला मतदान करणार नाहीत, असे म्हणणे योग्य नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi in delhi and devendra jhajhadiya in churu rajendra in between says rahul kaswan congress candidate attacks bjp vrd
First published on: 15-04-2024 at 14:51 IST