छत्रपती संभाजीनगर : परळी शहराचा कारभार निवडणुकीनंतर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राहील, अशी नगरपालिकेतील युतीची रचना पूर्ण केल्यानंतर माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या पत्नीला राष्ट्रवादी कॉग्रेस (अजित पवार )पक्षाने उमेदवारी दिली. नगरपालिकेवर या पूर्वी धनंजय मुंडे यांच्यावतीने वाल्मिक कराड हे काम पहायचे. आता ते कारागृहात असल्याने या नगरपालिकेतून कोणाला उमेदवारी दिली जाईल याची उत्सुकता होती. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्षाने संध्या देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.

परळी शहरातून हाकला जाणारा बीड जिल्ह्याच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह उभारल्यानंतर परळीवर वर्चस्व कोणाचे असा प्रश्न विचारला जात होता. मुंडे बंधू – भगिनी एक झाल्यानंतर महायुतीमध्ये कोणाचा वाटा किती असेल. गोपीनाथ मुंडे यांच्या परळीत भाजपचा वरचष्मा की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा याविषयीची उत्सुकता होती. महायुतीच्या सूत्रानंतर २३ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादी कॉग्रेसला आणि ११ नगरसेवक भाजपासाठी असे सूत्र ठरले असल्याचे सांगण्यात येते. पण याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी चर्चे अंती घेतलेल्या निर्णयात परळीतील महायुतीमध्ये धनंजय मुंडे यांचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार ) पक्षाकडून संध्या देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणाात उतरविले आहे. २०११ मध्ये गोपीनाथ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद झाले होते. तेव्हा धनंजय मुंडे यांनी पक्षांतर केले. तेव्हाच्या निवडणुकीत पहिले अडीच वर्षे दीपक देशमुख हे नगराध्यक्ष होते. तर दुसरे अडीच वर्षे बाजीराव धर्माधिकारी यांच्याकडे नेतृत्व होते.

दीपक देशमुख यांनी नंतर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. आता त्यांच्या पत्नीला उमदेवारी दिली आहे. एकत्र काम करणारे नेते आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पूर्वी पंकजा मुंडे यांचे केवळ तीन नगरसेवक परळी नगरपालिकेमध्ये होते. त्यामुळे भाजपच्या वाट्याला जे अधिक मिळाले ते योग्यच असे मानले जात आहे. या सर्व घडामोडीमुळे परळी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चुरस असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीड भाजपचे नेतृत्व डॉ. योगेश क्षीरसागरांकडे बीड नगरपालिकेसाठी डॉ. योगेश क्षीरसागर यांचा प्रवेश करुन घेतल्यानंतर भाजप बीड शहरातील सर्व ५२ जागांवर निवडणूक लढवत आहे. या नगरपालिकेत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी अशी लढत होईल. नगराध्यक्ष पदासाठी डॉ. ज्योती घुंबरे यांचे नाव भाजपने निश्चित केले असून त्या डॉ. क्षीरसागर यांच्या समर्थक आहेत. दरम्यान शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत असणारे प्रेमलता पारवे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, रात्रीतून त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेल्या. याशिवाय एमआयएम या पक्षानेही बीड पालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीड पालिकेची निवडणूक चौरंगी ठरण्याची शक्यता आहे.