Latest News on Maharashtra Politics Today : महाराष्ट्रासह बिहारमध्ये आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. राज ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषदेत मतदार याद्यांमधील घोळ वाचून दाखवला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षातील मंत्र्यांना तसेच नेत्यांना कानपिचक्या दिल्या, तर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी भाजपावर टीकेचा भडिमार केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तर जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी बिहार विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. या सर्व राजकीय घडामोडींचा सविस्तर जाणून घेऊ…

ठाकरेंनी वाचून दाखवला मतदार यादीतील घोळ

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सलग दुसऱ्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरे बंधूंसह इतर नेत्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी मतदार याद्यांमधील घोळ वाचून दाखवला. मतदार याद्यांमध्ये जोपर्यंत सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असा सल्लाही राज यांच्यासह उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला दिला. “मतदार याद्यांमध्ये सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो. राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवतच नसेल तर मला वाटतं की पहिला घोळ इथे आहे”, असे राज म्हणाले. आमची भेट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन काढण्यात आले आणि ते रद्द करण्याची आमची मागणी आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार ते पाहून पुढची भूमिका ठरवू असे राज यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांकडून मंत्र्यांना कानपिचक्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज मुंबईतील वरळी येथे मासिक बैठक पार पडली. या बैठकीतून अजित पवारांनी पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकारी यांना कानपिचक्या दिल्या. “आपला पक्ष सर्व धर्मियांचा आदर करतो, उगाच भलते सलते बोलू नका. पक्षाच्या चाकोरीत राहून काम करा अन्यथा मला पक्षाध्यक्ष म्हणून कठोर भूमिका घ्यावी लागेल”, अशी तंबीही त्यांनी यावेळी दिली. राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसानीची ३२ हजार कोटीची भरपाई आज मंजुर झाली आहे. याची माहिती गावागावात पोहोचली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. बहुतांश ठिकाणी आपल्याला महायुतीत लढायचे आहे, असेही निर्देशही अजित पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिले.

आणखी वाचा : बिहारमध्ये पुन्हा नाराजीनाट्य, मित्रपक्षाच्या भूमिकेमुळे भाजपाला टेन्शन; अमित शाह कसा मिटवणार वाद?

बच्चू कडू यांचा भाजपावर टीकेचा प्रहार

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व अचलपूरचे माजी आमदार बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्षावर टीकेचा भडिमार केला. दोन वर्षांपूर्वी बच्चू कडू यांच्या पक्षाच्या कार्यालयासाठी मुंबई येथील नरिमन पॉइंट परिसरात महायुती सरकारने जागा दिली होती. मात्र, बच्चू कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेतल्याने ही जागा काढून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना बच्चू कडू यांनी भाजपावर टीकेचा प्रहार केला आहे.”भाजपा हा साधासुधा पक्ष नसून दुधातही आणि पेढ्यातही विष आहे. साप जसा दूध पाजल्यावरही विष सोडतो, तसा भाजपा आहे. ते कधी उलटून विष सोडतील हे सांगता येत नाही. भाजपा हा त्यांच्या सामान्य कार्यकर्त्यासाठी विषारी ठरत असेल तर माझी काय स्थिती राहणार”, असा टोलाही कडू यांनी लगावला आहे.

बाबासाहेब पाटील यांचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तसेच सरकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला. “लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचे असते म्हणून आम्ही निवडणुकीच्या वेळी काहीतरी आश्वासने देत असतो. पण, काय मागायचे ते लोकांनी ठरवले पाहिजे”, असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानाचा शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला होता. चोहोबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी सारवासारव करत यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आज त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रकृतीच्या कारणास्तव आपण पालकमंत्रिपद सोडले अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा : BJP Drops 10 Sitting MLA : बिहारमध्ये भाजपाचे धक्कातंत्र, १० आमदारांसह माजी मंत्र्यांची तिकीटे कापली; कारण काय?

प्रशांत किशोर यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

बिहारमध्ये पुढील महिन्यात दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी केली आहे. यादरम्यान निवडणूक रणनीतीकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, “मी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे पक्षानेच ठरवले आहे. त्यामुळेच राघोपुर मतदारसंघातून तेजस्वी यादवांविरोधात दुसरा उमेदवार देणार आहोत. हा निर्णय पक्षाच्या एकूण फायद्यासाठी घेतला आहे. जर मी स्वतः निवडणूक लढलो, तर मला पक्षाकडे लक्ष देता येणार नाही”, दरम्यान, जन सुराज्य पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत त्यांना किती यश मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.