दिगंबर शिंदे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : तासगावच्या अंजनी आणि चिंचणीच्या पाटलांच्या वाड्यातून विधानसभेसाठी आता पासूनच खडाजंगी सुरू झाली आहे. खासदार व आमदार पुत्रामध्ये भावी आमदारकीसाठी सुरू असलेले इशारे भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत. वाघाचा छावा, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळीपासून ते बांगड्यापयर्ंतची भाषा जाहीर सभातून येउ लागली आहे. विशेष म्हणजे हीच भाषणे तरूणाईच्या हातातील मोबाईलवरही वाजू व गाजू लागली आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वीच कवठेमहाकाळ नगरपंचायत अध्यक्ष निवडीवेळीच हा राजकीय संघर्ष नव्या पिढीत सुरू झाल्याची झलक पाहण्यास मिळाली होती. गेल्या वर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीवेळी आरआर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी मातब्बर मंडळी एकत्र असताना चारीमुंड्या चित करीत या आघाडीला आस्मान दाखवत एकहाती सत्ता काबीज केली होती. मात्र, वर्षानंतर खासदार गटाने राजकीय सोंगट्यांचा वापर करीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करून नगराध्यक्ष पद पटकावले. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही दोन्ही गटामध्ये दोन्ही तालुक्यात मोठी चुरस पाहण्यास मिळाली होती. या चुरसीनंतर विजयी झालेल्या नूतन पदाधिकार्‍यांच्या सत्कार प्रसंगी आमदार पुत्र रोहित पाटील व खासदार पुत्र प्रभाकर पाटील यांनी एकमेकाना जाहीर सभेतून इशारे देत असताना आगामी आमदारकीची निवडणुक अटीतटीची राहणार असल्याचे संकेतच दिले आहेत.

हेही वाचा… शिक्षक मतदारसंघाच्या निमित्ताने भाजपची लोकसभा-विधानसभेची पेरणी

तासगाव तालुका हा राजकीय संघर्षाचा म्हणूनच ओळखला जातो. आरआरआबा आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच तालुक्यातील राजकीय संघर्षानी झालेली होती. अगदी आबा गृहमंत्री असतानाही खासदारांनी आग्रही भूमिका कधी सोडली नाही. मात्र, आबांच्या अखेरच्या काळात राजकीय युती झाली. आबांच्या पश्‍चात खासदारांनीही टोकाची भूमिका टाळून समन्वयाची भूमिका घेतली. याचे पडसाद खासदारकी तुमची तर आमदारकी आमची अशी अप्रत्यक्ष तडजोड झाल्याचे मानले जात होते. मात्र, कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमुळे ही अघोषित तडजोड मोडीत निघाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा… कोल्हापूरमध्ये भाजपची अशीही खेळी

आबांच्या पश्‍चात पत्नी सुमनताई पाटील यांना दोन वेळा आमदारकीची संधी मिळाली. राजकीय विरोधक संजयकाका पाटील यांना भाजपच्या उमेदवारीवर खासदारकी मिळाली. गेली आठ वर्षे हीच भूमिका असताना आता मात्र, खासदार पुत्र प्रभाकर पाटील आणि आमदार पुत्र रोहित पाटील यांना आमदारकीचे वेध लागले आहेत. गाव पातळीवरील राजकारणात दोघांचाही संपर्क वाढविण्यावर भर तर आहेच, पण राजकीय संघर्ष तेवत ठेवण्यासाठी जाहीर सभामधून टोकाचा संघर्ष करण्याची भाषाही वापरली जात आहे.

हेही वाचा… शिवसेना-वंचितचे भाजपपुढे आव्हान?, रामदास आठवले यांच्या नेतृत्वाची कसोटी

काही दिवसांपूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यात नागज येथे एका कार्यक्रमात खासदार पुत्र प्रभाकर यांनी आपल्या भाषणात आक्रमकपणा आणत मला विरोधकांना सांगायच आहे, संजय पाटील नावाच्या वाघाचा मी छावा आहे. एकदा मनावर जर आम्ही घेतलं, तर गुंडगिरी करणारे घरातून सुद्धा बाहेर पडणार नाहीत असा इशारा दिला होता. या इशार्‍याचा धागा पकडत शुक्रवारी मनेराजुरी येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार पुत्र रोहित यांनी पाटील यांनी आम्हाला कोणी घराबाहेर पडू देणार नाही, असे म्हणत असेल, तर आम्ही देखील बांगड्या भरल्या नाहीत. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असल्याचे सांगत आबांच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर गाठ माझ्याशी आहे, असे म्हणत प्रतिआव्हान दिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangali mp sanjay patils son prabhakar patil late r r patils son rohit patil is now preparing for assembly election print politics news asj