Top Political News in Today : आज दिवसभरात मुंबईपासून ते राजधानी दिल्लीपर्यंत अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारने अखेर मान्य केली, तर आझाद मैदानावर सलग चौथ्या दिवशी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना न्यायालयानं खडसावलं. दुसरीकडे- बिहारमधील एका कार्यक्रमाचं उद्घाटन करताना आईची आठवण झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. बलात्काराचा आरोप असलेले पंजाबमधील आम आदमी पार्टीचे आमदार पोलिसांवर गोळीबार करून फरार झाले, तर अरविंद केजरीवाल यांना हरवण्यासाठी काँग्रेसने ४४ कोटींची देणगी घेतली, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्याने केला. या सर्व घडामोडींबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
मनोज जरांगे यांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य?
मराठा समाजासाठी आजचा दिवस अतिशय ऐतिहासिक आणि निर्णायक ठरला. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या महायुती सरकारने मान्य केल्या. आज दुपारनंतर राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं. या शिष्टमंडळात मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि इतर सदस्यांचा समावेश होता. आझाद मैदानावर गेल्यानंतर शिष्टमंडळाने जरांगे यांना सरकारने तयार केलेला मसुदा वाचून दाखवला. मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीची होती.
राज्य सरकारने त्यांची ही मागणी अखेर मान्य केली. तर सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठी थोडा वेग लागणार आहे; पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शब्द दिला आहे. तसेच, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले आणि ज्यूस घेत उपोषण सोडलं. यावेळी जरांगे भावुक झाल्याचंही पाहायला मिळालं. यावेळी मुंबईत आलेले मराठे ढोल – ताशांच्या गजरात कार्यकर्ते बेभान होऊन नाचत होते. ‘पाटील पाटील’ च्या घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.
आणखी वाचा : मराठा आंदोलकांचं नेमकं कुठे चुकलं? मुंबईत ४ दिवसांत काय काय घडलं?
मराठा आंदोलनाबाबत उच्च न्यायालयात काय घडलं?
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलन प्रकरणी आज उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायधीश चंद्रशेखर व आरती साठे यांच्या बेंचने मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकार दोघांनाही खडेबोल सुनावले. केवळ २४ तास आझाद मैदानात उपोषणाला बसण्याची परवानगी दिलेली असताना तुम्ही कोणत्या अधिकाराने गेल्या चार दिवसांपासून तिथे बसला आहात? असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगे यांच्या वकिलांना विचारला. त्यावर, “९० टक्के आंदोलकांनी मुंबई सोडली आहे. त्यांची वाहनं देखील नवी मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहेत”, असं उत्तर वकिलांनी दिलं. दुसऱ्या बाजूला, “तुम्ही अजूनही आझाद मैदान व आसपासचा परिसर रिक्त का करू शकला नाहीत? आंदोलकांना तिथून हटवण्यासाठी तुम्हाला जरांगे यांचीच मदत का घ्यावी लागतेय?” असे प्रश्न न्यायालयाने राज्य सरकारला विचारले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या सकाळी ११ वाजता होणार आहे.
आईचा उल्लेख होताच पंतप्रधान मोदी झाले भावुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करणे, तसेच त्यांना डिजिटल सहकार्य करणे या कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन केले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी काँग्रेसच्या व्यासपाठीवरून झालेल्या शिवीगाळीचा उल्लेख केला. काँग्रेस आणि राजदच्या व्यासपाठीवरून माझ्या आईला शिवीगाळ केली. हा अपमान फक्त माझ्या आईचा नाही, तर देशातील प्रत्येक आईचा, बहिणीचा आणि मुलींचा आहे असं मोदींनी म्हटलं.
“भोजपुरी भाषेत त्यांनी बिहारमध्ये आईचं स्थान देवीदेवतांपेक्षा वरचं मानलं जातं, माझ्या आईने गरिबी पाहिली आहे. आईचं आपलं जग आणि आपला स्वाभिमान असतो. ही समृद्ध परंपरा असणाऱ्या बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी जे घडले, त्याची मी कल्पनाही केली नव्हती, बिहारमधल्या जनतेनेही हा विचार केला नव्हता”, असंही ते म्हणाले. यावेळी पंतप्रधान भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी बिहारच्या दरभंगा येथे झालेल्या काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेत पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करण्यात आल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही शिवीगाळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने केली असा दावा, भाजपा नेत्यांनी केला होता.
हेही वाचा : गुजरातमधील भाजपा नेत्यासह माजी आयपीएस अधिकाऱ्याला जन्मठेप; प्रकरण काय?
‘आप’चा आमदार पोलिसांच्या तावडीतून पळाला
पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पार्टीचे आमदार हरमीत सिंग यांना पोलिसांनी सोमवारी अटक केली होती. त्यांच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप होता. मात्र, कर्नाल येथील पोलीस ठाण्यात आणल्यानंतर हरमीत सिंग यांनी पोलिसांवरच गोळीबार करून तिथून पळ काढला. या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. सध्या पोलिसांकडून हरमीत सिंग यांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी एका महिलेने हरमीत सिंह यांच्यावर बलात्कार, फसवणूक आणि धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. आमदाराने घटस्फोटित असल्याचे सांगून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर विवाहित असूनही २०२१ मध्ये तिच्याशी लग्न केले. यानंतर, मंगळवारी सकाळी पोलिसांनी आमदाराला हरियाणातील करनाल येथून ताब्यात घेतले. स्थानिक पोलिस ठाण्यात नेताना हे संपूर्ण नाट्य घडले. दरम्यान हरमीत सिंग यांनी आज सकाळी फेसबुकवर लाईव्ह येत आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टीचे नेतृत्व पंजाबवर बेकायदेशीरपणे राज्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सौरभ भारद्वाज यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेले आणि त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे लढलेले आम आदमी पार्टी व काँग्रेसचे नेते एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. काँग्रेसने अरविंद केजरीवाल यांच्यासह आपच्या सर्व नेत्यांना पराभूत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाशी छुपी युती केली होती, असा आरोप सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत केला. अरविंद केजरीवाल यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने ४४ कोटी रुपये खर्च केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भाजपा किंवा निवडणूक आयोगाने इतक्या मोठ्या रकमेवर कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. भारद्वाज यांच्या या आरोपानंतर दिल्लीतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, काँग्रेस त्यांच्या आरोपांना नेमकं काय उत्तर देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.