Top Five Political News in Today : महाराष्ट्रात आज दिवसभरात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. मराठ्यांना खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्र दिले जात असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांनी केला, तर देवाभाऊंच्या जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या, तर आरक्षणाबाबत आमदार धनंजय मुंडेंनी मोठी मागणी केली. ‘मला संपवण्याचा डाव होता’, असा खळबळजनक खुलासा भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी केला. नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात? त्यासंदर्भातील घेतलेला हा सविस्तर आढावा…

खाडाखोड करून कुणबी प्रमाणपत्राचे वाटप – छगन भुजबळांचा आरोप

राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात सरकारने स्थापन केलेल्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भातील शासकीय अध्यादेश काढला, असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देताना गडबड होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं जात असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे. या खोट्या नोदींचा पर्दाफाश करण्यासठी राज्य सरकारने एक समिती नेमायला हवी, अशी मागणीही यावेळी भुजबळ यांनी केली. सरकार तुमचं ऐकत नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, त्याबाबत मी बोलणार नाही, असं उत्तर भुजबळांनी दिलं.

फडणवीसांच्या देवाभाऊ जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च, उद्धव ठाकरेंची टीका

राज्यात सध्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतीपिकांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्याला हाताशी धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. “देवाभाऊंच्या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये उधळलात, तेच कोट्यवधी रुपये तुम्ही शेतकऱ्यांना तातडीनं मदत म्हणून दिले असते, तर काय बिघडलं असतं? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. धाराशिवमधील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची उपस्थिती होती. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईवरून राज्य सरकारला लक्ष्य केलं.

आणखी वाचा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेमुळे भाजपाची कोंडी? निवडणुकीत बसणार फटका? कारण काय?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक

गेल्या चार ते पाच वर्षांपासून रडखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. या अर्जामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता, ईव्हीएमचा मुद्दा आणि सणासुदीचा काळ अशी विविध कारणे आयोगाने दिली होती. आज या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी निवडणुका घेण्यासाठी न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली. दिलेल्या वेळेआधी निवडणुका घेण्यात याव्यात असे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारसह निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, धनंजय मुंडेंची मागणी

मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी (१५ सप्टेंबर) बंजारा समाजाच्या वतीने बीड शहरात विराट मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आमदार धनंजय मुंडे यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली. यावेळी बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मुंडे यांनी केली. राज्य सरकारने यासाठी स्वतंत्र विशेषाधिकार समिती स्थापन करावी, असेही ते म्हणाले. दरम्यान- बंजारा आणि वंजारी समाज एकच आहे, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजाने तीव्र आक्षेप घेतला असून मुंडे यांनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : ५ हजार कोटींच्या भूखंड घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा मंत्री शिरसाटांवर पुन्हा हल्ला; शेअर केलेल्या व्हिडीओत नक्की काय?

मला संपवण्याचा प्रयत्न केला जात होता, अशोक चव्हाण यांचा खळबळजनक दावा

मराठवाड्यात कधीकाळी काँग्रेसची विचारधारा रुजवणारे अशोक चव्हाण सध्या भाजपात आहेत. आज त्यांनी लातूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना चव्हाण यांनी एक खळबळजनक दावा केला. “गेली १४ वर्ष मी वनवासात होतो. मला संपवण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यामुळेच मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, ” असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेससाठी मी जेवढ्या पोटतिडकीने काम केले, तेवढेच भाजपामध्येही करीत आहे. भाजपाने चांगले उमेदवार दिले तर लोक त्यांना निवडून देतील. काँग्रेसची अवस्था काय झाली आहे हे आपण पाहतो आहोत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होईल. लातूरकरांनी धक्का तंत्राचा वापर करीत आमदार रमेश कराड यांना निवडून आणलं. जिल्ह्यातील सहा पैकी पाच जागा महायुतीने जिंकल्या हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे, असेही ते म्हणाले.