विरोधकांनी मोठा गाजावाज करत ‘इंडिया’ या नावाने २६ पक्षांची भाजपाविरोधात आघाडी केली. मात्र, या आघाडीचे नेतृत्व कोण करणार? आघाडीत संयोजक हे महत्त्वाचे पद कोण भूषविणार यावर बराच खल सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी सुचविले आहे की, “प्रत्येक राज्यानुसार काही संयोजक असावेत, तसेच राष्ट्रीय स्तरावरही एकापेक्षा अधिक संयोजकांची नेमणूक केली जावी.” मात्र, जनता दल (युनायटेड) (JDU) पक्षाला लालू प्रसाद यादव यांचा हा प्रस्ताव फारसा रुचलेला नाही. जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधकांची आघाडी होण्यासाठी देशभरात प्रवास करून अनेक नेत्यांशी संवाद साधला होता. विरोधकांच्या आघाडीचे संयोजक पद आपल्याला मिळावे, या अनुषंगाने ते प्रयत्न करत असल्याचे दिसले होते. मुंबईमध्ये ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर असे दोन दिवस विरोधकांच्या आघाडीची बैठक पार पडणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लालू प्रसाद यादव यांच्या सूचनेवर भाष्य करताना जेडीयूचे ज्येष्ठ नेते म्हणाले, “राज्यस्तरावर संयोजक नेमणे चांगली कल्पना आहे. एनडीए युतीनेही अशाप्रकारे राज्यस्तरावर समन्वयक किंवा संयोजक नेमलेले आहेत. पण, राष्ट्रीय स्तरावर एकापेक्षा अधिक संयोजक नेमण्यात काहीही अर्थ राहत नाही. इंडिया आघाडीमधील असे महत्त्वाचे आणि उच्चस्तरीय निर्णयांबद्दल लालू प्रसाद यादव असे एकतर्फी कसे काय बोलू शकतात, हे आम्हाला समजले नाही.”

हे वाचा >> ‘इंडिया’ आघाडीत विसंगती; एकजूट भाजपाविरोधात, पण लढाई एकमेकांविरोधात

याच नेत्याने पुढे सांगितले की, लालू प्रसाद यादव नुकतेच राहुल गांधी यांना भेटले आहेत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीबाबत त्यांना तिथून काही माहिती मिळाली असावी. आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय संयोजक पद फारसे रुचलेले नाही, असे दिसते. कदाचित या विषयावरून त्यांना इतर पक्षांचाही पाठिंबा मिळालेला दिसतो.

चारा घोटाळ्याच्या प्रकरणात सध्या लालू प्रसाद यादव हे जामिनावर बाहेर आलेले आहेत. त्यांनी मंगळवारी (दि. २२ ऑगस्ट) गोपालगंज येथील आपल्या मूळगावी भेट दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना आघाडीबाबत प्रश्न विचारले असता ते म्हणाले, “संयोजक पदावरून थोडी मतमतांतरे आहेत. आघाडीमध्ये कुणीही संयोजक होऊ शकतो. तसेच इतरही संयोजक नेमून त्यांना चार राज्यांची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच प्रत्येक राज्यातही संयोजक नेमले जाऊ शकतात, ज्यामुळे राज्यांचाही चांगला समन्वय होईल.”

हे वाचा >> ‘इंडिया’ विरुद्ध एनडीए : विरोधकांच्या आघाडीने ‘यूपीए’ नाव का बदलले?

नितीश कुमार यांनी १६ ऑगस्ट रोजी दिल्ली दौरा केला होता. यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील काही नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची कुणाशीही भेट होऊ शकली नाही. या भेटीदरम्यान त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन वंदन केले होते. मात्र, विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना त्यांची ही कृती रुचली नव्हती. नितीश कुमार यांचे भूतकाळातील भाजपासोबत असलेले जवळचे संबंध पाहता, नितीश कुमार यांनी या कृतीमधून आघाडीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो, असा अंदाज काहींनी व्यक्त केला.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी महागठबंधनाचे नेते म्हणाले की, राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेआधी नितीश कुमार यांनी स्वतःची एक यात्रा काढायला हवी होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशानंतर काँग्रेस इतर कोणत्याही पक्षाला प्रमुख पद देण्याच्या मनस्थितीत नाही. तसेच विरोधकांचे नेतृत्व करत असताना भाजपाच्या राजकीय डावपेचांना तोंड देण्याचे नितीश कुमार यांचे कौशल्य नक्कीच फायदेशीर ठरू शकते. मात्र, त्यांचे हे कौशल्य बिहारमध्ये कामाला येते, राष्ट्रीय पातळीवर ते फारसे उपयुक्त ठरणार नाही.

विरोधी आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे २३ जून रोजी झाली, ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोठा पुढाकार होता. दुसरी बैठक १७ जुलै रोजी बंगळुरू येथे संपन्न झाली. ज्यामध्ये २६ पक्ष एकत्र आले होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यामुळे काँग्रेस आघाडीमध्ये नेतृत्वपदाची अपेक्षा करत आहे. बंगळुरू येथे झालेल्या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी माध्यमांशी संवाद न साधताच काढता पाय घेतला होता. विरोधकांना एकत्र आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा >> विरोधकांची आघाडी ‘स्वार्थासाठी’, लोक त्यांचा अजूनही द्वेष करतात; पंतप्रधान मोदींनी खासदारांना दिला कानमंत्र

आता मुंबई येथे होत असलेल्या दोन दिवसीय बैठकीत आघाडीची पुढची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. आघाडीची धोरणे, एकत्र रॅली काढणे, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणे, अशा विषयांवर चर्चा होऊ शकते. इंडिया आघाडीमधील उच्चस्तरीय पदांसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल इच्छुक आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tug of war for india convenors nitish kumar group upset by lalu prasad yadav statement