Latest News on Maharashtra Politics Today : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या आरोपांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पलटवार केला, तर ‘बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल’, असा इशारा संजय राऊतांनी दिला. ‘हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पाहा’ अशी आमदार संतोष बांगर यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. ‘मुख्यमंत्री फडणवीसांनी २ सप्टेंबरचा शासकीय अध्यादेश रद्द केल्यास त्यांचा सत्कार करू’, असे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, तर ‘वंजारी समाजाचे आरक्षण कमी करा’, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. आज दिवसभरात घडलेल्या या पाच महत्वांच्या घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

उद्धव ठाकरेंचा रामदास कदमांवर पलटवार

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या बोटांचे ठसे घेण्यात आल्याचा गंभीर आरोप शिंदे सेनेचे नेते रामदास कदम यांनी केला होता. मी खोटे बोलत असेल तर उद्धव ठाकरे आणि माझी नार्को टेस्ट करा, असे खुले आव्हानही त्यांनी दिले होते. कदम यांच्या या आरोपांवर आज उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला. ‘मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही आणि मला ते देण्याचीही गरज नाही. ठाकरे म्हणजे काय आहेत हे सर्वांना माहीतच आहे, असे माजी मुख्यमंत्री म्हणाले. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठिशी असल्याने मी उभा राहू शकलो. अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात, पण शिवाजी पार्कमधील हजारो माणसे माझे भाषण थांबवू का विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात, तेव्हा त्या या वेदनांवर रामबाण उपाय झाल्याचे मला वाटते”, असे ठाकरे म्हणाले.

संजय राऊत यांचा रामदास कदमांना गंभीर इशारा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांची विटंबना करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. ‘रामदास कदमांना विधानसभेवर पाठवण्यासाठी पक्षातील लोकांचा विरोध होता, तरीही उद्धव ठाकरेंनी त्यांना संधी दिली. आज तेच कदम गळ ओकत आहे. बाळासाहेबांची विटंबना करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दात त्यांनी कदमांचा समाचार घेतला. ‘रामदास कदम हे बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणी मातोश्रीवर उपस्थित नव्हतेच. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिथेच होतो. आमच्या सगळ्यांची काय अवस्था होती हे आम्हालाच माहिती आहे’, असेही राऊत म्हणाले. ‘उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेबांच्या मृत्यूची विटंबना करण्याइतकी या लोकांची मजल गेली असेल तर त्याची जबर किंमत मोजावी लागेल’, अशी टीकाही त्यांनी केली.

आणखी वाचा : Gujarat BJP New President : मोदी-शाहांच्या विश्वासू शिलेदाराकडे गुजरातच्या प्रदेशाध्यपदाची धुरा; कोण आहेत जगदीश विश्वकर्मा?

आमदार संतोष बांगर यांनी सरकारी अधिकाऱ्याला धमकावलं

‘हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित पाहा, अन्यथा पीक विमा कंपनीचे कार्यालय चुरा करू’, असा इशारा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिला. त्या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा नुकसानभरपाईची मागणी करत आहे. यादरम्यान शेतीचे पंचनामे करणाऱ्या एका पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला आमदार बांगर यांनी धमकावले आहे. ‘पीक विम्या संदर्भात काही कमी जास्त झाले तर संतोष बांगर ऐवढा वाईट माणूस नाही’, असे बांगर या अधिकाऱ्याला कॉलवर बोलताना रेकॉर्डिंगमधून ऐकू येत आहे.

२ सप्टेंबरचा जीआर रद्द केल्यास मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू – विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ सप्टेंबरचा जीआर रद्द केल्यास त्यांचा सत्कार करू, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्यात ओबीसी आरक्षणासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आज मुंबईत ओबीसी संघटनांची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी होणार असल्याची माहिती आहे. २ सप्टेंबर २०२५ रोजीच्या शासकीय अधिसूचनेनुसार हैदराबाद गॅझेटचा आधार घेत राज्य सरकारकडून मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे. या अधिसूचनेला ओबीसी समुदायाने तीव्र विरोध केला आहे. आजच्या बैठकीत फडणवीसांनी ही अधिसूचना रद्द केली तर आम्ही त्यांचे स्वागत करू असे वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा : Vijay Under Pressure : चेंगराचेंगरीनंतर विजय अडचणीत, भाजपाला राजकीय संधी? तमिळनाडूत भगव्याची शक्यता किती?

वंजारी समाजाचे आरक्षण कमी करा, मनोज जरांगेंची मोठी मागणी

‘मराठा आरक्षणाचा प्रश्न आता मार्गी लागला असून उगाच हैदराबाद गॅझेटला चॅलेंज करू नका, अन्यथा आम्हीही १९९४ चा शासकीय अध्यादेश रद्द करू’, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांना दिला. प्रकृती खालावल्यामुळे जरांगे हे छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेत्यांना इशारा दिला. १९९४ च्या शासकीय अध्यादेशात पावणे दोनशे जातींचा समावेश करण्यात आल्याचे जरांगे म्हणाले. वंजारी समाजाला दिलेले दोन टक्के आरक्षण सरकारने कमी करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या मागणीवर ओबीसी नेत्यांनी संताप व्यक्त केला असून आरक्षणावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.