‘उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत व उद्या संकट आले तर तर मदतीला धावून जाईन’ असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने भविष्यात भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का, अशी चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटापेक्षा उद्धव ठाकरे गटाचे पारडे अधिक जड दिसत असल्यानेच भाजपकडून ही खेळी खेळली जात असावी, अशी शंका घेतली जात आहे. तर मोदी यांच्या या वक्तव्याने भाजप विरोधी ठाकरे गटाकडे जाणाऱ्या मतांना रोख लागू शकतो. यामुळेच मोदी यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
राज्यात सध्या भाजप आणि ठाकरे गटात परस्परांवर अगदी खालच्या पातळीवर टीकाटिप्पणी केली जात आहे. भाजपचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दररोज लक्ष्य करीत असताना ‘टीव्ही ९’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सौम्य भूमिका घेतली. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत. तसेच त्यांच्या शस्त्रक्रियेच्या वेळी कशी विचारपूस करीत होते याचीही आठवण या मुलाखतीत सांगितली. मोदी यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एवढी सौम्य भूमिका का घेतली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
हेही वाचा : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंहांऐवजी मुलाला तिकीट; कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा परिणाम?
भाजपने शिवसेनेत फुट पडल्यावर एकनाथ शिंदे यांना सारी ताकद दिली. मुख्यमंत्रीपद तसेच त्यांच्या कलाने निर्णय घेण्यास मुभा दिली. राज्य भाजपचे नेते शिंदे यांच्याबद्द्ल नाके मुरडत असली तरी दिल्लीतील नेत्यांनी शिंदे यांना झुकते माप दिले. ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात येऊन शिंदे यांच्याकडेच शिवसेनेचे सारे नेतृत्व यावे या दृष्टीने प्रयत्न झाले. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती अद्यापही कायम आहे. यामुळेच मुंबई महानगरपालिकेसह अन्य पालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची खेळी खेळण्यात आली. तरीही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचेच भाजप वा महायुतीला आव्हान आहे.
सद्यस्थितीत महाविकास आघाडीत सर्वाधिक २१ जागा लढविणाऱ्या ठाकरे गटाचे अधिक उमेदवार निवडून येऊ शकतात, असे भाकित वर्तविले जात आहे. ठाकरे गट दुहेरी आकडा गाठण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात सर्वत्रच उद्धव ठाकरे यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक स्वत:हून ठाकरे यांच्या सभांना हजेरी लावत आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस व शरद पवार गटाचे उमेदवारही आपल्या मतदारसंघात ठाकरे यांच्या सभेसाठी आग्रही आहेत. प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ठाकरे यांची शिवसेना पुढे येईल, असेच एकूण चित्र आहे.
हेही वाचा : लिंगायत समाज प्रल्हाद जोशींवर नाराज, धारवाडमध्ये भाजपा अडचणीत?
मुख्यमंत्री शिंदे यांच्यापेक्षा ठाकरे गटाचे पारडे अधिक जड दिसत आहे. निवडणुकीत शिंदे यांच्यापेक्षा ठाकरे यांना अधिक पाठिंबा मिळत आहे. लोकसभेनंतर लगेचच विधानसभेची निवडणूक आहे. या दृष्टीनेच मोदी यांच्या वक्तव्याचे महत्त्व आहे. शिंदे गटाला फारसे यश मिळाले नाही तर भविष्यात भाजप शिंदे यांच्यापेक्षा ठाकरे यांना अधिक पसंती देऊ शकते. कारण शिंदे यांच्यापेक्षा कधीही ठाकरे हा चेहरा राज्यात अधिक लोकप्रिय व स्वीकारला जाणारा आहे.
हेही वाचा : मोदींच्या मायभूमीत क्षत्रिय समाजाच्या नाराजीमुळे भाजपाचा विजय कठीण?
मोदी यांच्या वक्तव्याने ठाकरे गटाची अडचण ?
मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती दाखवून राजकीय खेळी केली आहे. भाजपच्या विरोधात ठाकरे गटाकडे जाणारी मते रोखण्याचा प्रयत्न असू शकतो. कारण मोदी व ठाकरे हे भविष्यात एकत्र येणार असल्यास ठाकरे गटाला मते देण्याबाबत मुंबई, ठाण्यातील मतदार विचार करू शकतात. मोदी यांनी या वक्तव्याचा ठाकरे गटाला फटकाही बसू शकतो. यामुळेच मोदी यांनी वक्तव्य केले असले तरी उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची शक्यता साफ फेटाळून लावली आहे.