Shashi Tharoor काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपल्या एका लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यांच्याकडे असलेली ऊर्जा, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि संवाद साधण्याचे कौशल्य; यामुळे ते जागतिक स्तरावर भारतासाठी अनमोल व्यक्ती असल्याचे त्यांनी म्हटले. शशी थरूर यांनी ‘द हिंदू’ या इंग्रजी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधानांचे कौतुक केले. त्यानंतर शशी थरूर भाजपात सामील होणार, या चर्चेने जोर धरला. मात्र, आता स्वतःच शशी थरूर यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शशी थरूर खरंच भाजपात जाण्याची शक्यता आहे का? या चर्चेविषयी ते नक्की काय म्हणाले. ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेस आणि शशी थरूर यांच्यात सुरू असलेला वाद नक्की काय आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

शशी थरूर यांची भूमिका

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरवरील त्यांचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्ष भाजपामध्ये सामील होण्याचे संकेत नाही तर राष्ट्रीय एकता, हित आणि भारतासाठी उभे राहण्याचे विधान आहे. हिंदू या दैनिकातील लेखात शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली होती. आपल्या लेखात ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऊर्जा, त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आणि संवाद साधण्याचे कौशल्य, यामुळे ते जागतिक स्तरावर भारतासाठी अनमोल व्यक्ती आहेत; परंतु त्यांना अधिक पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे.”

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मंगळवारी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरवरील त्यांचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्ष भाजपामध्ये सामील होण्याचे संकेत नाही तर राष्ट्रीय एकता, हित आणि भारतासाठी उभे राहण्याचे विधान आहे. (छायाचित्र-पीटीआय)

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा जगासमोर आणण्यासाठी भारताने विविध देशांत पाच शिष्टमंडळ पाठवले होते. त्यातील एका शिष्टमंडळाचे नेतृत्व शशी थरूर यांनी केले आणि दहशतवादाबाबत देशाची भूमिका मांडली व ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली. त्यांच्या शिष्टमंडळाने पनामा, गयाना, कोलंबिया, ब्राझील आणि शेवटी अमेरिकेला भेट दिली होती. या शिष्टमंडळात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी त्यांच्याविरोधी भूमिका घेतली आहे, त्यामुळे शशी थरूर आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे.

शशी थरूर यांनी लेखाबाबत काय म्हटले?

  • मॉस्कोमधील एका कार्यक्रमात शशी थरूर यांना लेखाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी उत्तर दिले.
  • ते म्हणाले, दुर्दैवाने काही लोक जसे म्हणत आहेत तसे पंतप्रधानांच्या पक्षात (भाजपा) सामील होणे हे माझे लक्ष्य नाही. हे विधान राष्ट्रीय एकतेचे, राष्ट्रीय हिताचे आणि भारताबरोबर उभे राहण्यासाठी केले गेलेले विधान आहे.
  • “संयुक्त राष्ट्रांमध्ये २५ वर्षे सेवा केल्यानंतर मी भारतात परतलो आहे,” असे ते म्हणाले.
  • ऑपरेशन सिंदूरवरील शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना थरूर म्हणाले की, यामागील उद्देश केवळ भारताची सेवा करणे होते.
  • ते म्हणाले, “मला ही संधी मिळाल्याचा खूप अभिमान आहे.” हा लेख ऑपरेशन सिंदूरबद्दल होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“हा एक लेख आहे, ज्यामध्ये मी या मोहिमेच्या यशाचे वर्णन केले, त्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच, राष्ट्रीय हिताच्या महत्त्वाच्या बाबींमध्ये सर्व पक्षांची एकता दिसून आली,” असे थरूर म्हणाले. ते म्हणाले, “मी हे बोललो, कारण पंतप्रधानांनी स्वतः इतर देशांशी संवाद साधताना गतिमानता आणि ऊर्जा दाखवली आहे. त्यांनी इतर कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या आहेत आणि त्यांनी भारताचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी असे केले आहे.”

” भारतातील राजकीय पक्षांनी जगाला अखंड भारताचा संदेश दिला आहे. आजचा संदेश हा दहशतवादविरोधातील आहे, उद्या हा संदेश दुसऱ्या कशावर तरी असू शकतो. मला वाटते की त्याचे समर्थन महत्त्वाचे आहे,” असेही ते म्हणाले. त्यांनी म्हटले, “मीही बऱ्याच काळापासून असा विश्वास ठेवतो की, आपल्या लोकशाहीत राजकीय मतभेद सीमेवरच थांबले पाहिजेत. आपल्यासाठी भाजपाचे परराष्ट्र धोरण किंवा काँग्रेसचे परराष्ट्र धोरण असे काहीही नाही, फक्त भारतीय परराष्ट्र धोरण आणि भारतीय राष्ट्रीय हित आहे.” थरूर यांनी पुढे म्हटले, ” मी हे काही नवीन बोलत नाहीये. हे खूप वर्षांपूर्वी मी सांगितले होते आणि २०१४ मध्ये जेव्हा मी परराष्ट्र व्यवहार समितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा मी पहिल्यांदाच याबाबत सार्वजनिकरित्या सांगितले.”

भारत-पाकिस्तान संघर्षावर थरूर विरुद्ध काँग्रेस

ऑपरेशन सिंदूरवरील थरूर यांचा लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने एक्सवर शेअर केला होता. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर हल्ला करणाऱ्या काँग्रेससाठी थरूर यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेला स्तुतीचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. दुसरीकडे शशी थरूर भारत-पाकिस्तान संघर्षावर काँग्रेस पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात थरूर म्हणाले होते की, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वातील काही लोकांशी त्यांचे मतभेद आहेत. परंतु, केरळच्या निलांबूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीपूर्वी ते त्याबद्दल बोलणार नाहीत. शशी थरूर म्हणाले की काँग्रेस, काँग्रेसची मूल्ये आणि कार्यकर्ते त्यांना खूप प्रिय आहेत.

थरूर यांच्यावर काँग्रेस कारवाई करणार का?

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही यावर प्रतिकेया दिली आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शशी थरूर यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “मला इंग्रजी भाषा फार कळत नाही. त्यांची (थरूर) इंग्रजी भाषेवर चांगली पकड आहे. त्यामुळचे त्यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीचे सदस्यपद देण्यात आलेले आहे.” त्यांनी शशी थरूर यांना टोला लगावत म्हटले, “ऑपरेशन सिंदूर झाले त्यावेळी संपूर्ण विरोधी पक्ष भारतीय लष्कराच्या आणि सैनिकांच्या पाठीशी असल्याचे सांगत होतो. कारण, आमच्यासाठी देश सर्वप्रथम आहे. पण आता काही लोक मोदी प्रथम आणि देश द्वितीय असल्याचे म्हणत आहेत. आम्ही त्यात काय करणार?” अशी प्रतिक्रिया

शशी थरूर यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार का? असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, लोकांना जे वाटते, ते त्यांच्याकडून मांडले जाते. त्यामुळे त्यांनी काय लिहिले, यावर आम्हाला प्रतिक्रिया द्यायची नाही. आम्ही देशासाठी लढा देत राहू. राष्ट्रीय कार्यकारिणीचे ३४ सदस्य आणि ३० विशेष निमंत्रित सदस्य आहेत आणि प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. थरूर यांनी जे व्यक्त केले, तो त्यांचा वैयक्तिक दृष्टीकोन आहे,” असे ते म्हणाले.