पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) परिसरातील महामार्गांना जोडण्यासाठी रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील आराखडा ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आला असून, त्यासाठी अडीच ते तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, यातील वीस ते पंचवीस गावांतील रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाली असून, काही रस्त्यांची कामेही सुरू करण्यात आली आहेत. सातारा, अहिल्यानगर आणि सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडी या जोड रस्त्यांमुळे कमी होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
‘पीएमआरडीए’चे भौगोलिक क्षेत्रफळ ६ हजार २४६.२६ चौरस किलोमीटर एवढे असून, त्यामध्ये नऊ तालुके आणि ६९७ गावांचा समावेश आहे. या सर्व भागाचा प्रारूप विकास आराखडा (ड्राफ्ट डेव्हलमेंट प्लॅन- डीपी) ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आला होता. मात्र, तो काही कारणांनी रद्द करण्यात यावा आणि तसे पत्र न्यायालयाला देण्यात यावे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, अद्यापही हा आराखडा रद्द करण्यात आलेला नाही. त्याची प्रक्रिया ‘पीएमआरडीए’ प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे. त्यातच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने रस्त्यांची रुंदी वाढविण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार रस्त्यांचे जाळे नव्याने विकसित करण्यात येणार आहे. त्यानुसार ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतून जाणारे राज्यमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांना रस्ते जोडण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील आराखडा करण्यात आला आहे.रस्त्यांची कामे करताना प्रामुख्याने सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार केले जाणार आहेत. रस्त्यांची कामे करताना पावसाळी गटारे, केबल डक्टची कामेही पूर्ण करण्यात येणार असल्याने रस्त्यांची सातत्याने खोदाई करावी लागणार नाही, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
रस्त्यांच्या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात अस्तित्वातील रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. प्रादेशिक विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. रस्त्यांची कामे वेगवेगळ्या पॅकेजमध्ये करण्यात येणार असून, त्यासाठी भूसंपादनही तातडीने करण्यात येणार आहे. नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या रस्त्यांची रूंदी निश्चित करण्यात आली असून, ती जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. त्यानुसार २० ते २५ गावांतील रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता राज्य सरकारकडून मिळाली आहे. सातारा रस्ता, अहिल्यानगर आणि सोलापूर महामार्गांना जोडण्यासाठी जोड रस्ते करण्यात येणार आहेत. – डाॅ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए