पुणे : गावकीने एकत्र येऊन आपापल्या जागा पाणंद रस्त्यांसाठी सोडल्याचे आदर्श उदाहरण पुणे जिल्ह्यातील आडाचीवाडी या गावाने घालून दिले आहे. आडाचीवाडी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या जमिनी रस्त्यांसाठी देण्याबरोबरच श्रमदान करून रस्ते उभारणी केली आहे. या कामाची दखल राज्य शासनाकडूनही घेण्यात आली आहे.
आडाचीवाडीचे माजी उपसरपंच सूर्यकांत पवार यांनी त्याबाबतची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आडाचीवाडी, वाल्हे गावाचे माजी सरपंच दत्तात्रय पवार, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष हनुमंत पवार, सामाजिक कार्यकर्ते नामदेव पवार, अनिल पवार, सचिन पवार, अरविंद पवार, दिलीप पवार, अभिजित पवार या वेळी उपस्थित होते.
गावकऱ्यांनी एकत्र बसून पाणंद रस्ते खुले करण्याबाबत एक बैठक घेत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आपापसातील वाद दूर करून सर्वांनी एकमताने १५ पाणंद रस्ते खुले करण्याचे निश्चित केले. या सर्व १५ पाणंद रस्त्यांची रोव्हरद्वारे मोजणी करून जिओ रेफरन्सिंग करण्यात आले आणि त्याचे नकाशे तयार करण्यात आले असून, ग्रामसभेमध्ये सर्वानुमते ठराव करून रस्त्यांची नोंद ७/१२ उताऱ्यावर घेण्यासाठी पुरंदरचे तहसीलदार यांना अहवाल सादर करण्यात आला.
सर्व रस्ते ज्या सर्व्हे नंबरमधून जातात त्या ४३२ जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर फेरफार घेऊन इतर अधिकारांत रस्त्यासाठी ग्रामस्थांची वहिवाट अशी नोंद घेण्यात आली आहे. या कामाची दखल घेऊन राज्य सरकारने गावाचा विशेष सन्मान केला आहे, असे सूर्यकांत पवार यांनी सांगितले.