पुणे : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष (आप) स्वबळावर लढणार आहे. पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पक्षाकडून महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी युवा उमेदवारांची चाचपणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘आप’चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कड आणि वैभव टेमकर यांच्यासह शिवाजी कोलते, सुनील सवदी, सुभाष करांडे या वेळी उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असून, विविध राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गण आणि गट रचनेचे प्रारूप जाहीर झाले आहे. पुणे जिल्ह्यात ७३ गट आणि १४६ गण निश्चित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व जागा आप स्वबळार लढणार असून, लोकवर्गणीतून निवडणुकीसाठी निधी उभारण्यात येणार असल्याची असल्याची माहिती किर्दत यांनी दिली.

किर्दत म्हणाले, ‘जिल्ह्यातील सहकार प्रस्थापितांच्या ताब्यात आहे. पर्यायाने जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचेच प्राबल्य असते. मात्र, अनेक वर्षे स्थानिक प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जात नाही. केवळ सतरंज्या उचलण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जिल्ह्यातील सामान्य लोकांसाठी ‘आप’ने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पर्याय देत असताना केवळ प्रस्थापित घराणेशाहीमुळे अनेक वर्षे कोणतीही निवडणूक लढवू न शकलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना पक्षाकडून संधी देण्यात येँणार आहे.’

‘दूध उत्पादक शेतकरी, ग्रामीण भागातील शेती आणि शेतीचे जोडधंदे अडचणीत आले आहेत. शेतीमालाला चांगला भाव मिळत नाही. जिल्ह्यातील सरकारी शाळा सुमार दर्जाच्या आहेत. आरोग्य व्यवस्था ‘सलाईन’वर आहे. प्रस्थापितांच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील अनेक तालुके अविकसित, मागास ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ असा आरोप कड यांनी केला. ‘स्मार्टमीटरला विरोध, विस्थापित पीडितांना न्याय, जुन्नर-आंबेगाव-मावळ भागातील आदिवासींना मूलभूत सुविधा-हक्कांसाठी पक्षाच्या माध्यमातून लढा उभारणार असून, युवकांनी ‘आप’मध्ये प्रवेश करत या लढ्याला पाठबळ द्यावे,’ असे आवाहन टेमकर यांनी केले.

पंजाब, दिल्लीप्रमाणे सामान्य माणसांचा विकास, शिक्षण, आरोगी सुविधा, रोजगार हे विषय केंद्रस्थानी ठेवून प्रचार करण्यात येणार आहे. कोणत्याही पक्षाला, गटाला ‘आप’कडून पाठिंबा देण्यात येणार नाही. – मुकुंद किर्दत, राज्य प्रवक्ते, आप