पुणे : बंगालच्या उपसागरानंतर सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे दक्षिणेकडे पावसाळी स्थिती असून, त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होतो आहे. काही भागांत अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होऊन किमान तापमानात काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे थंडी काहीशी कमी झाली आहे. दोन दिवस असेच वातावरण राहणार असून, त्यानंतर मात्र रात्रीच्या किमान तापमानात पुन्हा घट होऊन थंडीचा कडाका वाढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात गेल्या आठवड्यात निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानाच्या स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाली होती. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही बहुतांश भागात रात्रीच्या गारव्यात वाढ झाली होती. किमान तापमानाच्या पाऱ्यात अनेक भागांत २ ते ३ अंशांनी घट झाली होती. दक्षिणेकडे ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या प्रभावातून सध्या पाऊस होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्यातून तमिळनाडू आणि परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सध्या दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यातून केरळ आणि परिसरात पाऊस होतो आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या दक्षिण भागात अंशत: ढगाळ स्थिती निर्माण होत आहे.

हेही वाचा : पुणे: वारजेतील हॉटेल कामगारांवर सशस्त्र हल्ला; तीन सराईत गुन्हेगारांना अटक

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात प्रामुख्याने ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ होऊन गारवा घटला आहे. बहुतांश भागात किमान तापमान सारसरीप्रमाणे आहे. ही स्थिती दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत राज्याच्या दक्षिण भागात तुरळक भागांत हलक्या सरींचीही शक्यता आहे. दोन दिवसांनंतर ढगाळ स्थिती दूर होणार आहे. मध्य भारत आणि उत्तर-पश्चिम भागातील तापमानातही घट होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सर्व भागांत १६ नोव्हेंबरपासून तापमानात पुन्हा घट होऊन थंडी वाढेल.

हेही वाचा : पुणे: पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ; देशभरातील दोन हजार ६३९ स्पर्धेक सहभागी

सलग चवथ्या दिवशी पुणे राज्यात थंड

सध्या राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असली, तरी पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत अद्यापही किमान तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते २ अंशांनी कमी आहे. पुणे शहरामध्ये सलग चार दिवसांपासून राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. पुण्यात रविवारी १३.३ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदिवले गेले. त्या पाठोपाठ महाबळेश्वर येथे तापमानाचा पारा १३.४ अंशांवर होता. रत्नागिरी, औरंगाबाद, परभणी, नागपूर, अमरावती आदी भागांतही रात्री काही प्रमाणात गारवा आहे. त्यात दोन दिवसांनंतर आणखी घट होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After two days increase again cold in maharashtra weather at state pune print news tmb 01