बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील ‘सहयोग सोसायटी’ निवासस्थानानजीक सोमवारी (दि. १७) सकाळी पदपथावर अघोरी पूजा केल्याचा प्रकार आढळला. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर लिंबू, मिरची, काळे कापड, काही पूजेचे साहित्य आणि उतारा आढळला.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष विपुल पाटील हे छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अजित पाटील, अभिनेते रामभाऊ जगताप यांच्यासह मॉर्निंग वॉकला बाहेर पडले असताना, त्यांना पदपथावर हा प्रकार आढळून आला. या ठिकाणी मांडलेल्या पूजेमुळे सकाळी चालणारेसुद्धा जरा दबकून आणि बाजूनेच जात होते, असे पाटील यांनी सांगितले.
पाटील यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना पदपथावरील साहित्य साफ करण्यास सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांना याबाबत थोडी भीती वाटत असल्याने पाटील यांनी कर्मचाऱ्यांशी बोलून, त्यांच्या मनातील भीती काढून टाकल्यानंतर त्यांनी हे साहित्य उचलले. ते एका पोत्यात भरून कचरा डेपोकडे नेईपर्यंत पाटील येथे थांबून राहिले. पाटील यांनी स्वतःच समाज माध्यमावर पोस्ट टाकून याची माहिती दिली.
‘निवडणूक जवळ आली, की या गोष्टी का घडतात, ज्या बारामतीचा विकास सिंगापूरच्या धर्तीवर केला जात आहे, तेथे खुळचट विचाराने रस्त्यावर कर्मकांड होत असतील, तर आपण नेमके चाललो आहे कुठे,’ असा प्रश्न पाटील यांनी केला.
दरम्यान, याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी म्हणाले, ‘घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली जाईल. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील. बारामतीत अशा प्रकारची घटना पहिल्यांदाच घडल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.’
