पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.तर लोकसभा निवडणुकीला अगदी काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.त्याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन दिवसांपूर्वी मंचर येथे मेळावा पार पडला.त्यावेळी शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली होती.त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या सर्व घडामोडी दरम्यान खासदार अमोल कोल्हे हे पुणे दौर्यावर होते.त्यावेळी अजित पवार यांनी मंचर येथील सभेत तुमच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली.त्या प्रश्नावर अमोल कोल्हे यांनी उत्तर देताना म्हणाले की,आम्ही ६० वर्षाचे झालो,तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे,अशी भूमिका मांडत अजित पवार यांच्यावर टीका केली.
तसेच ते पुढे म्हणाले की,दादा मोठे नेते आहेत.माझ्यावर त्यांनी जी वैयक्तिक टीका केली आहे.त्यावर मी एकच सांगेन की,मागील पाच वर्षातील माझ्या कामाचा लेखाजोखा असून त्याबद्दल जनताच सांगेल,त्याचबरोबर मी त्यांच्या वैयक्तिक टिकेला बांधिल नसून माझे नेते शरद पवार हे आहेत.तसेच त्याच सभेत शरद पवार यांच्यावर देखील टीका करण्यात आली. शरद पवार हे २०१४ पासून कोणत्याही सत्तेच्या पदावर नाहीत.त्यामुळे आम्ही ६० वर्षाचे झालो,तरी आम्हाला संधी मिळाली पाहिजे.तर तुम्हाला इतकी वर्ष संधी कोणी दिली.उपमुख्यमंत्री पद कोणी दिल, २०१९ मध्ये जो काही प्रकार झाला होता.सकाळचा शपथविधी झाल्यावर देखील मन मोठ करून पुन्हा संधी कोणी दिली होती अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.