जातीपातीचे, धर्माचे मुद्दे पुढे काढून देशासमोरील महागाई, बेरोजगारी, कोळसा टंचाई अशा महत्त्वाच्या प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका हास्यास्पद आणि तथ्यहीन आहे. वास्तविक राज यांनी वादग्रस्त विषय काढण्याऐवजी महाराष्ट्राच्या व देशहिताच्या गोष्टींवर भाष्य करायला हवे होते, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हे म्हणाले की, पवारांवर बोलले की प्रसिध्दी मिळते. देशभरातील सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मोट बांधण्याची क्षमता पवारांमध्ये आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी अनेकांना धास्ती वाटते, अशांनीच पवारांविषयी चुकीचा प्रचार चालवला आहे.

छत्रपत्री शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी आराध्यदैवत आहेत. त्यांच्या समाधीविषययी राज जे बोलले, त्यावरून त्यांना चुकीची माहिती पुरवण्यात आल्याचे दिसते. अनेक इतिहास संशोधकांनी याबाबतचे पुरावे समोर आणले आहेत. महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी सर्वप्रथम शोधली. त्यांनी महाराजांवर पोवाडा लिहिला. शिवजयंती त्यांनीच सुरू केली. समाधीच्या जीर्णोध्दाराचा विचार पुढे आला त्यावेळेस शिवाजी महाराज रयतेचे राजे होते, त्यामुळे त्यांच्या समाधीसाठी रयतेने पैसा उभारावा, असा मुद्दा लोकमान्य टिळकांनी मांडला. त्यानुसार, निधी उभारण्यात आला. परंतु तत्कालिन डेक्कन बँक दिवाळखोरीत निघाली. त्यामुळे तेव्हा जमा झालेले ८० हजार रूपयेही बुडाले.

१९२० साली टिळकांचे निधन झाले. पुढे, १९२७ साली ब्रिटीश सरकारने महाराजांची समाधी बांधण्यासाठी पुढाकार घेतला होता. इतिहास शुध्द तर्काच्या आधारे मांडायचा असतो. तो मांडताना द्वेष निर्माण होऊ नये तथा धार्मिक भावना भडकता कामा नये. इतिहासाच्या ज्वाज्वल्य प्रेरणेचा वापर राष्ट्रनिर्माणासाठी झाला पाहिजे. केवळ इतिहासाचे दाखले देऊन एकमेकांना भडकावणे, एकमेकांची डोके फोडणे यापेक्षा रयतेचे कल्याण अधिक महत्त्वाचे आहे, असे कोल्हे म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol kolhe slams raj thackeray over his comment on sharad pawar pune print news scsg