पुणे: भावाच्या जन्म पत्रिकेवर तोडगा सांगण्याच्या बहाण्याने एका ज्योतिषाने तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सहकारनगर भागात घडली. आरोपी ज्योतिषीने वनस्पती देण्याची बतावणी करुन तरुणीला कार्यालयात बोलावले. त्याने कार्यालायत तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ज्योतिषाला अटक करण्यात आली आहे.
अखिलेश लक्ष्मण राजगुरू (वय ४५) असे अटक करण्यात आलेल्या ज्योतिषीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीने तिच्या मोठ्या भावाची जन्मपत्रिका दाखवण्यासाठी आरोपी ज्योतिषीची भेट घेतली होती. त्या वेळी राजगुरू याने पत्रिका पाहून भावाच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी एका विशेष वनस्पतीची आवश्यकता असल्याची बतावणी केली होती. शनिवारी (१९ जुलै) तरुणीला वनस्पती घेण्यासाठी कार्यालयात या, असा संदेश पाठवून बोलावून घेतले.
पीडित तरुणी पुणे-सातारा रस्त्यावरील त्याच्या कार्यालयात गेली. आरोपी राजगुरुने वनस्पती देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग केला. या प्रकारामुळे ती घाबरली. तिने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी राजगुरू याला अटक केली.
आठवड्यापूर्वी शहरातील उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क भागात एका भोंदूला अटक करण्यात आली होती. सोन्याचा हंडा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने एका महिलेकडून अडीच लाख रुपये उकळले होते. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी भोंदूला अटक केली होती. तक्रारदार महिला कोथरूड भागात राहायला आहे. उदरनिर्वाहासाठी ती घरकाम करत होती. भोंदूने महिलेला सोन्याचा हंडा देण्याचे आमिष दाखविले होते. त्याने महिलेला एक मडके दिले होते. मडक्यात माती भरून दिली, तसेच त्याल लाल कापड लावले. पंधरा दिवसांनी मडके उघडून पाहा, असे त्याने महिलेला सांगितले होते. महिलेने मडके उघडून पाहिल्यानंतर त्यात माती आढळून आली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती.
सातारा रस्त्यावर आरोपी ज्योतिषी राजगुरु यांचे कार्यालय आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.- राहुल गौड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस ठाणे</strong>