चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत बंडखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. ते महाविकास आघाडीसोबत येतील अशी अशा त्यांनी व्यक्ती केली. हातात हात घालून आपण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करू, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी राहुल कलाटे यांना केले. परंतु, राहुल कलाटे हे पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
हेही वाचा- कसबा पोटनिवडणूक : “काँग्रेस पक्षाने माझ्यावर अन्याय केला”; बाळासाहेब दाभेकर यांचा आरोप
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात काही शंका नाही. भाजपाच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि बंडखोर नेते राहुल कलाटे यांच्यात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. आमदार सुनील शेळके म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादी चे नाना उर्फ विठ्ठल काटे यांना उमेदवारी देण्यात आली. आमचे सहकारी राहुल कलाटे हे देखील महाविकास आघाडीकडून तीव्र इच्छुक होते. त्यांचं म्हणणं वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचवले होते.
महाविकास आघाडी म्हणून हातात हात घालून काम करू चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करू असे आवाहन त्यांनी राहुल कलाटे यांना केले. राहुल कलाटे हे महाविकास आघाडी सोबत येतील असा विश्वास त्यांना व्यक्त केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी चे आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाऊसाहेब भोईर हे आणि राहुल कलाटे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. त्यांनी राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती.