पुणे : शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाने या निवडणुकीतही मतटक्का वाढविण्याची परंपरा जपली. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात झालेले सर्वाधिक मतदान या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. कसबा मतदारसंघापाठोपाठ या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला मतदारसंघात शहरी आणि महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन वेळा आमदार असलेले भीमराव तापकीर यांच्यापुढे राष्ट्रवादी ( शरद पवार) पक्षाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांचे आव्हान आहे.

हेही वाचा >>>मावळमध्ये मतदानाचा उच्चांक कोणाला मारक?

खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण भागात मतदान प्रक्रियेला प्रारंभ होण्यापूर्वीच मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. त्यामध्येही महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. मतदान केंद्रातील वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारजे येथे झाला. मात्र, दहा मिनिटांनंतर तो पूर्ववत झाला. त्यामुळे मतदानाला कोणतीही अडचण आली नाही. तर, चौधरी शाळेत मतदानापूर्वीच रांगा लागल्याचे दिसले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा, मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. नवमतदार आणि युवा मतदारांबरोबरच महिला मतदारांची लक्षणीय उपस्थिती खडकवासला मतदारसंघात दिसून आली.

हेही वाचा >>>भोसरीत समाविष्ट गावातील कौल निर्णायक?

मतदारांचा सकाळपासून सुरू असलेला प्रतिसाद सायंकाळपर्यंत कायम राहिला. पहिल्या दोन तासात ५.४४, त्यानंतर अकरा वाजेपर्यंत १७.०५ एवढे मतदान झाले. दुपारी एक आणि तीन वाजता अनुक्रमे २९.०५ आणि ४०.४० टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५१.५६ टक्के मतदान नोंदविण्यात आले. मोठा भौगोलिक विस्तार असूनही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची परंपरा या मतदारसंघाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही जपली आहे. त्यामुळे हा वाढता मतटक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assembly election 2024 large voting continues in khadakwasla assembly constituency pune print news apk 13 amy