पुणे : ‘उच्च दर्जाची करमणूक काय असते याचा वस्तुपाठ घालून देणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत असताना ठामपणे भूमिका घेणारे पु. ल. देशपांडे यांच्या कर्तृत्वाचे स्मरण केलेच पाहिजे. पण, पुलंच्या निधनानंतर २५ वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे केवळ स्मरणरंजनामध्ये अडकून न पडता २५ वर्षांतील आणि त्यातही गेल्या ११ वर्षांतील बदलांची नोंद घेतली गेली पाहिजे. नाटक, कविता, चित्रपट, चित्र-शिल्पकला कुठे चालल्या आहेत याचा वेध घेतला पाहिजे. त्या दृष्टीने तरुणाईला सामावून घेत ‘पुलोत्सवा’ने आधुनिक संवेदनांशी नाळ जोडावी,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.

‘महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावरील महत्त्वाचे घटक असलेल्या या व्यक्तिमत्त्वाची छाया त्यांच्या आठवणींमधून, विचारांमधून, की त्यांनी केलेल्या प्रेरणादायक कार्यामधून शोधायची हा निकडीचा प्रश्न आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोहिनूर ग्रुप प्रस्तुत आणि पु. ना. गाडगीळ अँड सन्स आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’चे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी पुलंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त रेखाटलेल्या व्यंगचित्राचे अनावरण करून सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी आळेकर बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पुलोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे अजित गाडगीळ, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, ‘चिंटू’कार चारुहास पंडित या वेळी उपस्थित होते. उद्घाटनानंतर पुलंच्या पंचाहत्तरीनिमित्त सुधीर मोघे आणि मुक्ता राजाध्यक्ष दिग्दर्शित ‘या सम हा’ हा लघुपट दाखविण्यात आला.

आळेकर म्हणाले, ‘पुलं हे वेगळ्या संवेदनांवर भाष्य करणाऱ्या लेखक-कवींच्या नववाङ्मयाचे स्वागत करणारे, प्रस्थापितांविरोधात विचार मांडणारे होते. त्यांनी निर्माण केलेला कलाकृतींचा दर्जा त्यांनीच एका उंचीवर नेऊन ठेवला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासह लोकशाहीचा संकोच होत असताना आणीबाणीविरोधात पुलंनी कठोर भूमिका घेतला होती. त्यानंतर जनता पक्षाचे सरकार आल्यावर ते राजकारणापासून दूर झाले होते.’

जोशी म्हणाले, ‘पुलंच्या विनोदाने कधी कोणाला बोचकारले नाही. पण, समाजातील विसंगतीवर मार्मिकपणे बोट ठेवले. आजच्या काळात खिलाडू वृत्ती हरवलेल्या समाजात विनोद बहरू शकत नाही. चांगला विनोद निर्माण झाला, तरी तो पचवण्याची शक्ती समाजात उरलेली नाही. पोटदुखीचा त्रास असलेल्या कलाविश्वाला पुलंनी दुसऱ्याच्या चांगल्या गुणाचे मुक्तकंठाने कौतुक करायला शिकविले. सध्याचे मराठी लेखक आत्ममग्न असून, सामाजिक काम करणाऱ्या संस्था आणि चळवळी यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी त्यांना आस्था वाटत नाही. बाबा आमटे यांच्यापासून अनिल अवचट यांच्या कार्याविषयी पुलंना कळवळा होता.’

मुंबईहून पुण्याला स्थायिक झाल्यानंतर पुलं हे पुण्यातील कलाकारांची नाटके पाहण्यासाठी येत असत. त्यांनी ‘महानिर्वाण’ नाटक दोनदा बघितले होते. कोणतीही पूर्वसूचना न देता तिकीट काढून नाटकाच्या प्रयोगाला येणारे पुलं आणि जयवंत दळवी असे दोन साहित्यिक आम्ही अनुभवले. माझ्या सासऱ्यांमुळे (बाळासाहेब अभ्यंकर) पुलं, वसंतराव देशपांडे आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्याशी माझा स्नेह जुळला. – सतीश आळेकर, ज्येष्ठ नाटककार