पुणे : राज्यात जाती-धर्मामध्ये अस्थिरतचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र, या प्रकारे धर्मावर चालणारे राजकारण फार काळ टिकणार नाही. यापुढील काळात शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेबरोबरच अठरापगड जातींना बरोबर घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही,’ असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले.
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी विकास पासलकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) शुक्रवारी जाहीर प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. भोर-वेल्हा-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर, शहराध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, शुक्राचार्य वांजळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले,‘ सन १९८७ पासून राजकारणाला प्रारंभ केल्यानंतर अनेक माणसे जोडली. काही माणसे शरद पवार यांच्या विचारधारेमुळे जोडली गेली. विविध संस्थांमध्ये काम करताना आपल्या विचारांची माणसे कशी टिकतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केला. राजकारणात अनेक चढ-उतार आले. मात्र जिल्ह्याने सातत्याने प्रेम केले. त्यामुळेच राज्याचे प्रश्न सोडविताना पुणे जिल्हाही सर्व क्षेत्रात अग्रेसर राहवा, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
यशवंतराव चव्हाण यांनी ज्या प्रमाणे सुसंस्कृत राजकारण केले, विरोधकांचा सन्मान ठेवला. खालच्या स्तरावर जाऊन टीका कधी केली नाही. हेच पथ्य आता पाळावे लागणार आहे. धर्माच्या नावाने होणारे राजकारण यापुढे जास्त काळ चालणार नाही. विचारधारा आणि अठरापगड जातींना बरोबर घेतल्यानंतर यापुढे राजकारण करता येणार आहे.’
‘विकास पासलकर यांच्या प्रवेशामुळे पक्षाला पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता मिळाला आहे. त्यामुळे पासलकर यांच्याकडे प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रवक्ता हे महत्त्वाचे पद आहे. प्रवक्त्यांना प्रश्नांना कसे उत्तर द्यावे, पक्षाची भूमिका कशी मांडावी, आणि कोणताही समाज दुखावला जाणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. पासलकर ही भूमिका जबाबदारीने पार पाडतील, असा विश्वास आहे,’ असे पवार यांनी सांंगितले.
‘पक्ष देईल ती जबाबदारी क्षमतेने पार पाडली जाईल. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा कधीही सोडणार नाही,’ असे विकास पासलकर यांनी सांगितले.
जिल्हा बँकेला विनंती
राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी बँक २६ लाखांचा निधी देणार आहे. त्याबाबतची माहिती बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना दिली. हा संदर्भ घेत पवार म्हणाले, ‘हा निधी वाढवून १ कोटी करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने एक कोटींचा निधी दिला आहे. राज्य सहकारी बँकेनेही दहा कोटींची मदत केली आहे. जिल्हा बँक देत असलेला निधी बँकेच्या सामर्थ्याच्या मानाने पुरेसा नाही. त्यामुळे एक कोटी बँकेने द्यावेत, अशी मी विनंती करत आहे. मी संचालक मंडळावर नाही. त्यामुळे मला विनंती करावी लागत आहे.